‘अनेक जाती, समाज स्वत:साठी स्वतंत्र मागण्या करीत आहेत. यातून समरसता कशी येणार? अशा मागण्यांमुळेच आज समाजाचे विघटन होत असते. यामुळे राष्ट्राला खऱ्या अर्थाने समरसतेची गरज आहे’, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले.
संघ परिवाराचा भाग असलेल्या राष्ट्र सेविका समितीच्या नागपूर विभागाचा विजयादशमी उत्सव रविवारी रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात झाला. त्यावेळी शांताक्का अध्यक्षस्थानी होत्या. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य प्रमुख अतिथी होत्या.
‘आपला देश शक्तीची उपासना करणाऱ्यांचा आहे. याची अनेक अलौकिक उदाहरणे आहेत. स्वयंकटिबद्धता ही आपली परंपरा आहे. समर्पण भावनेने मातृभूचे रक्षण करण्याचा इतिहास आहे. प्रत्येकात राष्ट्राप्रती समर्पण असेल तर विघातक शक्तीही घाबरतात, हरतात हे आजवर दिसून आले आहे. पण अशावेळी जातीची लागण आपल्यातून जात नाही,’ अशी खंत शांताक्का यांनी व्यक्त केली.
डॉ. वैद्य यांनी समितीच्या स्वयंसेविका व उपस्थितांना ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये स्त्रीची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘पितृ देवो भव:, मातृ देवो भव: हे आपल्याकडे अनादी काळापासून बोलले जाते. पण यासोबतच राष्ट्र देवो भव: ही संकल्पना रुजण्याची गरज असून हे कार्य महिलांना करायचे आहे. महिलांकडे काहींचा वाईट नजरेने बघण्याचा दृष्टिकोन हा काही महिलांमुळेच निर्माण झाल्याचे डॉ. वैद्य आवर्जून म्हणाल्या. ‘मॉडेलिंगच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलांमुळे असंस्कृत लोकांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. त्यातून अनुचित घटना घडतात. ‘आज समाजात स्त्रीला देवी मानणारे व स्त्रीवर सैतानासारखे तुटून पडणारे, असे दोन वर्ग सापडतात. यापैकी सैतानी मानसिकता ही केवळ शिक्षणाच्या अभावानेच निर्माण होते, असेही डॉ. वैद्य म्हणाल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट