‘ती माझी मुले आहेत. मला ती परत दे,’ असे म्हणत शेजाऱ्याने दोन चिमुकल्यांवर ब्लेडने सपासप वार करून स्वतःचाही गळा कापला. नंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास झिंगाबाई टाकळी परिसरातील गीतानगर भागात घडली. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. क्रिश दिगांबर वाकोडे (वय ५), त्याची बहीण निहारिका (वय अडीच वर्षे) व शेजारी विलास भुजाडे (वय ३१), अशी जखमींची नावे आहेत. तिघांवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. क्रिश हा केजीमध्ये शिकतो. मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
वाकोडे हे आमदार आशिष देशमुख यांच्याकडे माळीकाम करतात. विलास याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. विलासला पत्नी रेखा व दोन वर्षांचा मुलगा आहे. भुजाडे व वाकोडे कुटुंब समोरासमोर राहात असल्याने दोन्ही कुटुंबाचे सलोख्याचे संबंध होते. बुधवारी दुपारी क्रिश व त्याची बहीण निहारिका परिसरातील मंदिरात सुरू असलेल्या भजन कार्यक्रमाला गेले होते. दुपारी विलास परिसरातील किराणा दुकानात गेला. तेथून ब्लेडचे पाकिट व दोन वेफर्सची पाकिटे खरेदी केली. वेफर्स देण्याच्या बहाण्याने विलास हा दोघांना भजनातील कार्यक्रमातून त्यांच्या घरी घेऊन गेला. दोघांना घेऊन तो दुसऱ्या माळ्यावर गेला. तेथे दोघांना पाकिट दिले. त्यानंतर विलासने स्वतःच्या गळ्यावर,छातीवर व हातावर ब्लेडने सपासप वार केले. दोन्ही मुलांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. विलासने आधी निहारिकाचा व नंतर क्रिशचा ब्लेडने गळा चिरला. दरम्यान, ही बाब विलासची पत्नी रेखाला दिसली, ती धावली. पत्नी येईल, या भीतीने विलासने पहिल्या माळ्यावरून खाली उडी मारली. रेखा या त्याच्या मागे धावल्या. नागरिकही त्याच्या मागे धावत होते. नागरिक व रेखा या पाठलाग करीत असतानाच विलासने विष प्राशन केले.
पाचशे रुपये न दिल्याने घडली घटना
बुधवारी सकाळी पाचशे रुपये न दिल्याने विलासने भुजाडे कुटुंबासोबत वाद घातला होता. त्याने नेमके कोणत्या कारणाने दोन्ही मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हे तपासादरम्यान कळले. तूर्तास याबाबत काहीच सांगता येत नाही, असे मानकापूर पोलिसांनी सांगितले.
बहिणीसाठी भावाची धडपड
विलासने निहारिकाच्या हातावर ब्लेडने वार करायला सुरुवात केली. क्रिश हा लगेच बहिणीला बिलगून तिला वाचवित होता. त्यामुळे विलासने क्रिश याच्यावरही ब्लेडने सपासप वार केले. विलासने इमारतीवरून उडी मारल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर वैशाली यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जखमी मुलांना मेयोत दाखल केले.
मी मुलाला बघू की...
विलास हा पळायला लागला. रेखा या त्याच्या मागे धावत होत्या. त्या चौकापर्यंत विलासच्या मागे धावल्या. मधेच मुलगा एकटा घरी रडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाच्या काळजीने त्या घरी परतल्या. ‘पतीला बघण्यासाठी का गेली नाही,’ असे शेजारी रेखा यांना म्हणाले. मी घरी एकटी आहे. मी मुलाला बघू की त्यांना...
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट