मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामाची स्तुती केली. मात्र, ज्या सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या भरवशावर हे काम करण्यात आले, त्या कंत्राटदारांना अद्याप पैसेच मिळाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कुही, काटोल, उमरेड, सावनेर, रामटेक आदी तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पद्धतीने ही कामे देण्यात आली. भर उन्हाळ्यात आम्ही ही कामे केली. काम झाल्याबरोबर पैसे देऊ असे आम्हाला सांगण्यात आले. त्या उत्साहाने आम्ही कामे केली. या कामाचे कौतुकही सर्वत्र करण्यात आले. मात्र काम होऊनही आम्हाला पैशांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याची खंत कौस्तुभ काळे, शहजाद पटेल, लिखित टापरे, साजित वाजिद, सुधीर वासनिक, भरत वेगड यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडेही त्यांनी निवेदन देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जाचा डोंगर वाढतोय
कुही तालुक्यातील खेंडा गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम केले. २५ जून रोजीच काम पूर्ण झाले आहे. असे असूनही अद्याप कामाचे पैसे मिळाले नाही. व्याजाने पैसे घेऊन आम्ही हे काम पूर्ण केले. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असून शासनाने त्वरित पैसे देण्याची मागणी सुधीर वासनिक यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट