प्राचीन भारताचा इतिहास हा अनेक वर्षे अंधारातच होता. बुद्धनिर्वाणाचा काळ निश्चित झाल्यानंतर त्या आधारे ऐतिहासिक घटनांची संगती लावण्यात आली. हा सगळा कालखंड पाली साहित्यामध्ये नोंदविण्यात आला आहे. एका अर्थाने पाली भाषेमुळेच भारताचा इतिहास जगासमोर आला आहे, असे मत दिल्ली विद्यापीठाच्या बुद्धिस्ट स्टडीज विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. संघसेन यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि डॉ. आंबेडकर कॉलेज यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ६० व्या धम्मचक्रप्रवर्तनदिनाच्या निमित्त या संमेलनाचे आयोजन दीक्षाभूमी येथील प्रेक्षागृहात करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दिल्ली विद्यापीठाच्या बुद्धिस्ट स्टडीज विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. भदन्त सत्यपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई सुसाई, संमेलनाचे निमंत्रक आणि समिती सदस्य विजयकुमार चिकाटे, पाली भाषेचे तज्ज्ञ डॉ. बालचंद्र खांडेकर, कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, डॉ. प्रकाश खरात, डॉ. गौतम कांबळे आणि डॉ. मोहन वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतात संस्कृतचा जन्म होण्याचा आधी पाली मान्यता पावलेली जनसामान्यांची भाषा होती. मोहेंजोंदडो काळातही तिचे पुरावे आढळतात. या भाषेचा विस्तार आणि ऱ्हास गांभीर्याने घेतला पाहिजे. आजचे शासक सम्राट अशोकासहित अनेकांना ‘गद्दार’ ठरवित आहे. अशा वेळी पाली भाषेतील साहित्यांचे संकलन करून वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे, असेही डॉ. संघसेन म्हणाले.
बौद्ध साहित्य हे जगातील सर्वात मोठे साहित्य असून, जगातील बहुतांश भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे. भगवान बुद्ध हे संस्कृत महापंडित होते आणि तरीही त्यांनी अनुयायींना जनबोलींचा स्वीकार करायला लावला. त्यामुळे, बौद्ध साहित्यात जनसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. अशोकपूर्व भारताचा इतिहास आणि भूगोल पाली भाषेत आहे. पालीला ३ हजार वर्षांचा इतिहास असून प्राचीन लोकसंस्कृती जाणून घेण्यासाठी तिचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. भदन्त सत्यपाल म्हणाले. भदन्त आर्य नागार्जुन सुरई सुसाई यांनी या संमेलनाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. अर्धे जग बौद्ध संस्कृतीने व्यापले होते असेही ते म्हणाले. विजयकुमार चिकाटे यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट