म. टा. प्रतिनिधी, नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोज हजारो रुग्णांचा राबता रहातो. हृदय, मेंदू, पोटाचे विकार, यकृत आणि मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरत आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुपरला भीषण पाणीटंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे वॉर्डांमध्ये स्वच्छतेला खिळ बसली आहे. शिवाय शल्यक्रियागृहातही पाणी अपुरे पडत असतल्याने शल्यक्रियेतदेखील अडथळा निर्माण झाला आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागातील सात वॉर्डांमध्ये २३० रुग्ण भरती आहेत. यात प्रामुख्याने हृदय, गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी, मेंदू, मूत्रपिंड, आतड्यांचे विकार, पोटाच्या विकाराचे प्रत्येकी ३० रुग्ण भरती आहेत. यासह मेंदूची शल्यक्रिया झालेले ४५ आणि हृदय शल्यक्रिया झालेले ४५ रुग्ण भरती आहेत. शिवाय येथील बाह्यरुग्ण विभागात रोज शेकडोंच्या संख्येने बाहेरगावचे रुग्ण उपचाराला येतात.
या रुग्णांचा राबता पाहाता, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला रोज किमान दीड लाख अर्थात १५ लिटर पाण्याची तहान लागते. यातले बहुतांश पाणी प्रामुख्याने सिव्हिटीएसची ओटी, मेंदू, मूत्रपिंड आणि पोटाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लागते. मात्र, ओसीडब्ल्यूकडून सध्या यापैकी निम्माही पाणीपुरवठा होत नाही. पाणीसाठवणूक करण्यासाठी सुपरमध्ये साडेपाच लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या आहेत. त्यासाठी रोज किमान एक तास पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सकाळी १५ आणि सायंकाळी १५ मिनिटच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जमिनीवरील टाकीत पाणीच साचत नसल्याने ते उंचावरील टाकीत साठवणे कठीण होऊन बसले आहे. पाणीटंचाईची झळ वॉर्डामधील स्वच्छतेला बसत आहे. वॉर्डातही पाणी मिळत नसल्याने रुग्णांची मात्र दैना सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट