Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

पद्मपूर विकासापासून दूरच!

$
0
0

खेमेंद्र कटरे, गोंदिया

सातव्या शतकाची साक्ष देणाऱ्या जैन तीर्थकरांच्या मूर्ती आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथे सापडल्या. संस्कृत महाकवी तथा नाटककार भवभूतींचे जन्मस्थळ असल्याचे स्पष्ट झाले. पद्मपूरला पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणे शक्य होते. पण, उत्खननाच्या आधारावर सरकारने चार ठिकाणी कुंपण घालण्यापलीकडे काहीही केले नाही. कालिदासांना राजाश्रय मिळाला आणि त्यांच्या नावे संस्कृत विद्यापीठ झाले. भवभूतींचे जन्मस्थळ मात्र उपेक्षित राहिले.

भवभूती यांचे वाङ्मयातील स्थान अढळ आहे. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात भवभूतींचा जन्म पद्मपूरनगरीत झाल्याचा ठोस पुरावा 'मालतीमाधव' ग्रंथात सापडतो. विदर्भात 'पद्मपूर' नावाचे गाव सात गावे आढळतात. यात चंद्रपूर जिल्ह्यात दोन, भंडारा तीन तर गोंदिया जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. भवभूतींच्या इतिहास संशोधनातील कुतूहल वाढत गेले. भवभूतींवर जैन धर्माचा प्रभाव होता. यासंबंधी सबळ पुरावे आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथे उत्खननात सापडल्याने हेच भवभूतीचे जन्मस्थान असल्याचे शिक्कामोर्तब झाले. यासंदर्भात आमगाव येथील संशोधक प्रा. ओ. सी. पटले यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.

उत्तरेकडील कन्नोज महाराजा यशोवर्ने भवभूतींची आपल्या दरबारी 'सभा कवी' म्हणून नेमणूक केली होती. ग्वालियरच्या नैऋत्येस ४२ किमी अंतरावरील पद्मपवाया येथे भवभूतींचे शिक्षण झाले. येथे त्यांचे स्मारक असून त्याच ठिकाणी त्यांनी 'मालती माधव' हा ग्रंथ लिहिला. तत्पूर्वी इ.स.पूर्व ७३०मध्ये पहिला ग्रंथ 'महावीर चरित्र' हा वाल्मिकी रामायणाचा पूर्वार्ध विदर्भात असताना लिहिला. त्यानंतर 'उत्तर रामचरित्र' हा वाल्मीकी रामायणाचा उत्तरार्ध लिहून काढला.

आमगावनजीकच्या नाथबाबा पहाडावर साधना व साहित्य लेखन केले. तेथेच त्यांनी महावीर चरित्र ग्रंथरचना केली, असे मानले जाते. त्यांच्या साहित्यातील वर्णनानुसार पद्मपूर येथे अनेक पुरावे सापडले आहेत. लखनौचे पुरातत्व तज्ज्ञ जैन यांनी २००४मध्ये या ठिकाणी भेट दिली. राज्य सरकारच्या पुरातत्व विभागानेही अनेक वाऱ्या केल्या. मात्र ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या स्थळाला उपेक्षेविना काहीच प्राप्त होऊ शकले नाही.

दरवर्षी पर्यटन विकासासाठी नव्याने नियोजन केले जाते. परंतु नियोजन आराखड्यात पद्मपूरला स्थान देण्यात येत नाही. मुळात लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत भवभूतींचे स्मारक, कलादालन आणि भवभूतींच्या साहित्याच्या ग्रंथालयातून वारसा जपणे शक्य होते. उत्खननात जैन तीर्थकरांच्या मूर्ती, शारदेची प्राचीन मूर्ती, हिंदू देवी-देवतांची मूर्ती, शिव मंदिराच्या बांधकामाचे अवशेष, नटराजाची मूर्ती असे अनेक साहित्य या ठिकाणी सापडले.

या साहित्याची जुळवाजुळव करून संग्रहालय उभारणे शक्य होते. यातून भवभूतींच्या आठवणींना उजाळा तथा त्यांच्या साहित्याचाही सन्मान झाला असता. परंतु आजवर झालेल्या आजी-माजी एकाही लोकप्रतिनिधींनी या स्थळाला दूरदृष्टिकोनातून पाहिले नाही. त्यामुळेच भवभूतींचे जन्मस्थान उपेक्षितच आहे. खासदार अशोक नेते आणि आमदार संजय पुराम यांनी याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

उत्खननातील पुरावे

पद्मपूर येथील उत्खननात जैन तीर्थकरांच्या मूर्ती, शारदेची प्राचीन मूर्ती, हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती, शिव मंदिराच्या बांधकामाचे अवशेष, नटराजाची मूर्ती असे अनेक पुरावे पुरातत्त्व विभागाला सापडले आहेत. उत्खननात सापडलेली नटराजाची मूर्ती १९५०च्या सुमारास नागपूरच्या संग्रहालयात ठेवण्यात आली. १९४७ पूर्वी इंग्रजांनी भगवान आदिनाथांच्या दोन मूर्ती येथून नेल्या. त्यांची भंडारा जिल्ह्यातील कारधा येथे वैनगंगा नदीकाठावर स्थापना केली. यापैकी एक मूर्ती तेथे असून दुसरी गायब आहे. विशेष म्हणजे, पद्मपुरात सापडलेली शारदेची खंडित मूर्ती इंग्लंडच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या भारतीय मूर्तीपेक्षाही सरस असल्याचा दावा इतिहासकारांनी केला आहे.

असे पडले नाव

भवभूतींचे जन्मस्थान पद्मपूरनगरीच्या नावासंबंधी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. या क्षेत्रात पूर्वी शेकडो तलाव होते व तलावात मोठ्या संख्येत कमळ फुलत असायचे. कमळाला 'पद्म' असे नाव आहे. कमळांचा परिसर म्हणून या ठिकाणाला 'पद्मपूर' असे नाव पडले असावे, असा तर्क भवभूती इतिहास अभ्यासकांनी मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>