औषध कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी पडून डॉक्टरदेखील प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर करीत आहेत. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत असून, हा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही इंडियन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. सी. एम. बोकडे यांनी येथे दिली.
प्रतिजैविकांच्या अतिरिक्त वापरावर बाळरोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने ८ व ९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनुपम सचदेवा उपस्थित राहणार आहेत. त्यानुषंगाने या महत्त्वाच्या विषयाकडे पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. बोकडे यांन लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘जंतूंचा नायनाट करण्यासाठी काही डॉक्टर प्रतिजैविकांचा आग्रह धरतात. मात्र, हा डोस पूर्ण केला नाही तर पुढच्यावेळी संबंधित जंतूच जुन्या औषधांना जुमानत नाहीत. दुसरीकडे प्रतिजैविकांच्या क्षेत्रात संशोधनांचा अभाव आहे. नवीन मॉलिक्यूलच तयार होत नसल्याने जंतू प्रतिजैविकांना जुमानत नाहीत. त्यामुळे याचा वापर कमी करणे हा एकमेव उपाय सध्या वैद्यकक्षेत्राकडे आहे. त्यानुषंगाने डॉक्टरांसाठी नव्याने दिशादर्शक तत्त्वे तयार होणार आहेत.’
प्रतिजैविकांच्या अतिवापरासाठी डॉक्टरांइतकेच पालकही जबाबदार असल्याचे नमूद करीत डॉ. वसंत खळतकर म्हणाले, ‘आजार लवकर बरा करण्याच्या हट्टापायी पालकच प्रतिजैविकांचा आग्रह धरतात. त्यात जरा बरे वाटले की औषधे मध्येच सोडली जातात. त्यामुळे डॉक्टरांना न विचारता औषध घेणे जसे घातक असते तसेच न विचारता औषध बंद करणेदेखील घातक असते.’ पत्रपरिषदेला सचिव डॉ. प्रवीण डहाके, डॉ. अनुप रडके, डॉ. सुचित बागडे, डॉ. अविनाश गावंडे आणि डॉ. आर. जी. पाटील उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट