पदवीनंतर स्पर्धा परीक्षांकडे वळल्यानंतर यश लवकर मिळण्याची शाश्वती नसते. यासाठी दहावी, बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या 'ट्रिक्स' आत्मसात केल्यास लवकर यशस्वी होता येते. या उद्देशाने दहावी व बाराव्या वर्गापासून शाळेत मार्गदर्शन देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला असून, लवकरच यावर परिपत्रक निघण्याची शक्यता आहे.
अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. यातून शालेय अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांचा सराव होईल. दहावी आणि बारावीतूनच अभ्यासाच्या नोंदी टिपणे, महत्त्वाचे विषय हाताळणे, कोणत्या प्रश्नांवर भर दिल्यास याचा लाभ स्पर्धा परीक्षेत होऊ शकतो, यावर हे मार्गदर्शन होणार आहे. सरकारी नोकरीच्या संधी भरघोस उपलब्ध आहेत. मात्र, परिपूर्ण मागर्दशन, आर्थिक परिस्थिती आणि अभ्यासाला होणाऱ्या विलंबामुळे अनेकांना प्रशासकीय सेवेत प्रवेश घेता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवा, या उद्देशाने दहावी आणि बाराव्या वर्गात विशेष वर्ग घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत यावर परिपत्रक येण्याची शक्यता आहे.
शाळांमध्ये हे परिपत्रक लवकरच धडक देणार असून आठवड्यातून दोन दिवस स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय स्तरावरून सुरू केल्यास विद्यार्थ्यांना लवकर यश मिळविता येते. त्यासाठी दहाव्या, बाराव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे.पदवीनंतर स्पर्धा परीक्षांकडे वळणारे लाखो विद्यार्थी असतात. अशा विद्यार्थ्यांना आधीच स्पर्धा परीक्षेचे धडे दिल्यास, परीक्षेतील महत्त्वाचे बारकावे सांगितल्यास त्यांना लवकर यश काबीज करता येईल, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने उपसंचालकांसोबतही मौखिक चर्चा केल्याचे कळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट