‘शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी शेतकऱ्यांची जी मुले शहरात राहायला गेली आहेत त्या किसानपुत्रांनीच आता पुढे यावे’, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब यांनी केले. जनमुक्ती संघर्ष वाहिनी व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या विद्यमाने शनिवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
‘लोकनायक जयप्रकाश नारायण स्मृती संदर्भात जनआंदोलनापुढील आव्हाने आणि शेतकरी आत्महत्यांचे वास्तव’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. बजाजनगरातील कस्तुरबा भवन येथे झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जागतिकीकरण किंवा गरिबीमुळे होत नसून, त्या जाचक कायद्यांमुळेच होत असल्याचे सांगून हबीब म्हणाले की, जागतिकीकरणामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या असत्या तर त्या सर्वच राज्यांमध्ये झाल्या असत्या. मात्र, तसे होताना दिसत नाही. गरिबीचा विचार केला तर आज पूर्वीपेक्षा खेड्यांमध्ये अधिक संपन्नता दिसते. त्याचवेळी ही संपन्नता शेतीतून आलेली नाही हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
शेतकऱ्यांची जी मुले बाहेर गेलीत, त्यांच्या तेथील उत्पन्नातून ही संपन्नता आली आहे. शेतीला एखादा जोडधंदा करण्याचा सल्ला अनेकदा देण्यात येतो, मात्र आज वास्तव हे आहे की शेती हाच जोडधंदा झाला आहे. अनेक व्यापारी, नेते, कर्मचारी शेतकरी झाले आहेत. कारण शेतीवर आयकर लागत नाही. ज्याची उपजीविका शेतीवर आहे तो शेतकरी ही खरी शेतकऱ्याची व्याख्या आहे. मात्र, ती बाजूला ठेवून जोडधंदा म्हणून कर वाचविण्यासाठी शेती घेणारेही शेतकरी झाले आणि त्या ‘शेतकऱ्यां’च्या भल्यासाठी साऱ्या योजना येत असल्याने खरा शेतकरी तसाच राहतो, असे त्यांनी सांगितले.
सिलिंग, भू अधिग्रहण व अत्यावश्यक वस्तू या कायद्यांमुळेच शेती आणि खऱ्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सिलिंग कायद्याने शेतीतीत प्रतिभा मारण्याचे काम केले. या क्षेत्रात येणारी गुंतवणूक थांबली. त्यामुळे हा कायदा उठवावा लागेल तरच एखादा ‘नारायण मूर्ती’ शेती क्षेत्रातही तयार होईल, असा विश्वास हबीब यांनी यावेळी व्यक्त केला. व्यासपीठावर गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे संयोजक डॉ. प्रकाश तोवर उपस्थित होते.
गांधी हा मानवतेचा विचार : वानखडे
या व्याख्यानमालेत शुक्रवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांचे ‘गांधी मरत का नाही’, या विषयावर व्याख्यान झाले. गांधी हाडा-मांसाचे व्यक्ती नव्हते तर तो मानवतेचा विचार होता. हा विचार गांधींनी आपल्या कृतीतून कोटवधी भारतीयांच्या मनात रुजवला होता. तो विचार जगलाच नाही तर समृद्ध होत गेला. हा विचार कधी मेला नाही, पुढेही मरणार नाही म्हणून गांधी मरत नाही, असे वानखडे म्हणाले. भारताच्या पंतप्रधानांपासून अमेरिकेच्या अध्यक्षापर्यंत सर्वच ज्याचे तत्त्वज्ञान मान्य करतात, जगातील सर्वाधिक साहित्य निर्मिती ज्या व्यक्तीच्या जीवनावर होते, त्या महात्मा गांधींचे नाव ‘मजबुरी’ कसे असू शकेल, असा सवालही वानखडे यांनी यावेळी केला. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी गांधी स्मारक निधीच्या विश्वस्त डॉ. सुनीती देव होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट