दसऱ्याच्या दिवशीची नागपूरची ओळख देशभरात आहे. याचे कारण यादिवशी नागपुरात दोन मोठे सोहळे मागील अनेक वर्षांपासून नियमितपणे होत आहेत. दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होतो. तर रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक भवन परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होतो. पण, दरवर्षी अखंडितपणे होणाऱ्या या कार्यक्रमांवर यंदा पावसाळी वातावरणामुळे चिंतेचे सावट आहे.
दीक्षाभूमीसाठी महापालिकेची तयारी
दीक्षाभूमीवरील मुख्य कार्यक्रमासाठी महापालिकेची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांसाठी मोठा तंबू असलेला मंच उभारला जातो. हा तंबू ‘वॉटरप्रुफ’ असतो. पण बाकी सोहळ्यासाठी तंबू नाही. यामुळे ऐन सोहळ्यावेळी पाऊस आला तरी कार्यक्रम तिथेच होणार आहे. पण दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी येणाऱ्या भक्तांचे पावसापासून रक्षण होण्यासाठी महापालिकेने परिसरातील सरकारी कार्यालये आणि शाळा सज्ज ठेवल्या आहेत. माता कचेरी, आयटीआयसोबतच डॉ. आंबेडकर कॉलेजच्या सर्व इमारतींचा आसरा भक्तांना घेता येणार आहे. पण एकूणच सोहळा सुरू असताना पाऊस आल्यास काय? ही चिंता आयोजकांना आहेच.
संघाच्या कवायती पावसातच
जगप्रसिद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीला झाली होती. यामुळे संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी एक उत्सव विजयादशमीचा असून अनेक वर्षांपासून हा उत्सव कवायतींसह रेशीमबागच्या मैदानावर होत आहे. यंदादेखील हा उत्सव दसऱ्याच्या दिवशीच सकाळी ७.४० वाजता रेशीमबाग मैदानावर होत आहे. पण, त्यावर पावसाचे सावट आहे. पण पाऊस आला तरी उत्सव नियोजित वेळी व नियोजित स्थळीच होईल. कार्यक्रम सुरू होण्याआधी पाऊस आलाच तरी तो शेजारच्या सभागृहात हलवला जाऊ शकतो. पण संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा याआधीही पावसात झाला आहे. त्यामुळे पाऊस आला तरी पावसातच त्याच मैदानावर उत्सव होईलच, असे संघातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
रावणदहन की विसर्जन?
पावसाची भीती दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी जागोजागी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमांनादेखील आहे. सध्या पाऊस सायंकाळी येत आहे. त्यामुळे रावण दहनात रावण जळूच शकणार नाही. परिणामी, रावणाचे दहन नाही तर विसर्जन होईल का? अशी विनोदी चर्चादेखील सध्या व्हॉट्सअॅपवरून सुरू झाली आहे. पण, पाऊस आल्यास रावण दहन कार्यक्रम खरंच संकटात येईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट