‘मनुस्मृतीमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. धर्मांतरणानंतर महिलांचा खऱ्या अर्थाने विकास होऊ लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा संदेश दिला. मात्र, आजही चुकीचे संदेश समाजात पसरविले जात आहेत’, अशी टीका करीत हा वाद दीक्षाभूमी विरुद्ध रेशीमबाग आहे, अशा परखड शब्दांत माजी महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी येथे टीकास्त्र सोडले.
६० व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमी येथील सभागृहात आयोजित महिला परिषदेत ‘धर्मांतरणानंतर महिला विकास’ या विषयावर मंथन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी या चर्चासत्रात सहभाग घेऊन महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकला. यावेळी माधवी खोडे, सरोज आगलावे, रमा पांचाळ, डॉ. प्रज्ञा बागडे, रेखा खोब्रागडे, उषा बौद्ध, तक्षशीला वागदरे, इंदू दुपारे, भुवनेश्वरी मेहेरे आदी उपस्थित होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चार भिंतीत अडकलेल्या महिलांसाठी शिक्षणाचे द्वार मोकळे करून दिले. त्यावेळी दिलेल्या लढ्यामुळे आज महिलांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली आहे. एकीकडे असे सकारात्मक चित्र असताना आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. संविधानात महिलांना समान अधिकार देण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना सन्मानाने जगणे शिकविले. मात्र, आज संविधानाच्या मूळ ढाच्यालाच धक्का पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक न्याय या शब्दांऐवजी समरसता आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाऐवजी पंथनिरपेक्ष असे शब्द वापरून दिशाभूल करण्यात येत असल्याची टीका गायकवाड
यांनी केली.
टीव्ही सीरिअल्स बघू नका!
महिलांमध्ये सर्वच क्षेत्रांत कौशल्य प्राप्त करण्याची क्षमता आहे. मात्र, अनेक महिला टीव्ही सीरिअल्समध्ये आपला अमूल्य वेळ खर्ची घालतात. यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे वाचन करा, असा सल्ला आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट