पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी काही दुष्काळी भागातून तर माणसासोबत पाळीव जनावरांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीवर मात करून हिरवे स्वप्न साकार करण्याकरिता सोमनाथच्या भूमीत युवाशक्तीने साद घातली. रविवारपासून बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात श्रमसंस्कार शिबिरास थाटात प्रारंभ झाला.
युवा पिढीच्या शक्तीला नवनिर्मितीच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी बाबा आमटे यांनी १९६७साली मे महिन्याच्या तप्त उन्हात चंद्रपूर जिल्ह्यातील 'सोमनाथ'च्या निबिड अरण्यात श्रम-संस्कार छावणीची नीव रोवली. युवा पिढीच्या शक्तीला नवनिर्मितीच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या ४८ शिबिरांमधून लाखो युवकांना आनंदवन, सोमनाथ या प्रकल्पाच्या कार्यातून समाजाभिमुख विकासकामे करण्याची प्रेरणा मिळाली. यंदा सोमनाथमध्ये देशभरातून सुमारे ५००हून अधिक युवक सहभागी झाले आहेत.
सर्व युवा स्पेशल : डॉ. विकास आमटे
विदर्भातील रखरखत्या उन्हात स्वइच्छेने व स्वयंप्रेरणेने या समाजोपयोगी कार्यात सहभागी झालेले सर्व युवा 'स्पेशल' आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी काढले. श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ध्वजारोहण डॉ. भारती आमटे यांच्या हस्ते झाले. श्रमसंस्कार शिबिरातील युवक पुढील सात दिवसात मातीशी नाळ जोडतो, कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांचे प्रत्यक्ष जीवन अनुभवतो. जी गोष्ट निर्माण करू शकत नाही त्या बीज, पाणी व अन्न यांचा योग्य वापर व आदर करायला नक्की शिकवेल, असा विश्वास डॉ. भारती आमटे यांनी व्यक्त केला. श्रमसंस्कार शिबिराच्या संयोजक शीतल आमटे असून शिबिर प्रमुख रवींद्र नलगिरवार हे आहेत.
कॉलनी तलावाचे खोलीकरण
छावणीचा कालावधी १५ ते २२ मेदरम्यान असतो. पहाटे ४ वाजता छावणीचा दिनक्रम सुरू होतो. बहुभाषिक प्रेरणागीते गात, श्रमप्रतिष्ठेचे नारे देत तरुणाई साडेपाच वाजता श्रमदानासाठी सज्ज होते. दुपारी तरुणाईशी सामाजिक विकास आणि परिवर्तन कार्यात सक्रिय असणारे कृतिशील कार्यकर्ते संवाद साधतात. याचबरोबर विविध मुद्यांवर चर्चासत्रे घडतात आणि नव्या संकल्पना जन्माला येतात. छावणी शेती, जंगल आणि जमिनीशी आपले नाते जोडते. मनातील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती देते. रविवारी युवकांनी सोमनाथ प्रकल्पाच्या कॉलनी तलावात खोलीकरण करण्याचे काम केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट