विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) आणि बेलारूस येथील स्टेट ऑफ युनिव्हर्सिटी यांच्यात कोर्स, तंत्रविकास आणि संशोधन या क्षेत्रात सहयोग करार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
बेलारूस येथील विद्यापीठ आणि व्हीएनआयटी यांच्यात कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे संशोधन व अभ्यासक्रम यात सहयोग करार झाला आहे. त्यानुसार दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण होणार आहे. व्हीएनआयटीच्या सभागृहात झालेल्या सहयोग कराराच्या कार्यक्रमाला बेलारूसच्या संसदेचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान डॉ. मिखाईल मॅसनीकोविच, डॉ. मिखाइल बटुरा तर व्हीएनआयटीच्या गव्हर्निंग बोर्डचे अध्यक्ष विश्राम जामदार आणि संचालक डॉ. नरेंद्र चौधरी उपस्थित होते. यावेळी बेलारूसचे विटाली वोवक, सिमायन शहापिरो, ब्लादिमीर सेन्को, निकोलय, काजरोव्हेट्स, तामारा डोलगोशये, युरी कोजीयातको, मारत झिलीन्स्की, मिखाइल मायतलीकोव तसेच महाराष्ट्र विधान मंडळाचे सहसचिव महेंद्र काज, सभापतींचे अवर सचिव सुनील झोरे उपस्थित होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बेलारूसचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात बेलारूस आणि भारत सरकार यांच्या शैक्षणिक विकास आणि संशोधन या क्षेत्रात सहयोग करार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार देशातील काही निवडक संस्थांसोबत बेलारूस विद्यापीठाने सहयोग करार करण्याचा निर्णय घेतला होता. शैक्षणिक दर्जा आणि संशोधन क्षेत्रात व्हीएनआयटीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नागपुरातील या प्रथितयश संस्थेची निवड करण्यात आली आहे. या सहयोग करारामुळे व्हीएनआयटीतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण आणि संशोधनाकरिता बेलारूस विद्यापीठात अध्ययन करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय भविष्यात ड्युअल डीग्री प्रोग्राम आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात सहभागी होता येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट