डोंबिवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. संमेलन अध्यक्षपदासाठी डॉ. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे, डॉ. मदन कुळकर्णी व जयप्रकाश घुमटकर हे चार उमेदवार रिंगणात उतरले असून एकानेही १७ तारखेपर्यंत अर्ज परत न घेतल्यास निवडणूक चौरंगी होऊ शकते.
अध्यक्षपदासाठी महामंडळाकडे अर्ज येण्याची बुधवारची शेवटची तारीख होती. अर्जांची छाननी केल्यानंतर निवडणूक अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री व उपनिर्वाचन अधिकारी मोहन पारखी यांनी सायंकाळी उमेदवारांची नावे जाहीर केली. ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार कुमार काळे यांनी नागपूर, पुणे व औरंगाबाद येथून अर्ज भरले असून लेखक व गीतकार प्रवीण दवणे यांनी पुणे व मुंबई येथून अर्ज सादर केले आहेत. विदर्भ संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी यांनी नागपुरातून अर्ज सादर केला असून ठाण्याचे लेखक जयप्रकाश घुमरकर यांनी पुण्यातून अर्ज सादर केला आहे.
चार घटक संस्थांचे एकूण ७०० मतदार, पाच समाविष्ट संस्थाचे एकूण २५०, संलग्न संस्थांचे ११, निमंत्रक संस्थांचे ८५, पूर्वाध्यक्ष १४ आणि महाकोष विश्वस्त ९ असे एकूण १०६९ मतदार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहेत. अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी नावे परत घेण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर असून, त्याचदिवशी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. मतदारांकडे मतपत्रिका पाठविण्याची तारीख २५ ऑक्टोबर असून १० डिसेंबरपर्यंत या मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्याकडे पोहोचणे अपेक्षित आहे. मतमोजणी ११ डिसेंबरला होणार असून त्याच दिवशी अध्यक्षपदाचा दावेदार ठरेल.
बंद लिफाफ्याचे गूढ उलगडले
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मदन कुळकर्णी यांनी विदर्भ साहित्य संघाकडे सादर केलेल्या बंद लिफाफ्याचे गूढ अखेर समोर आले असून, त्यात केवळ नावांची अदलाबदल असलेले दोन उमेदवारी अर्ज असल्याचे निदर्शनास आले आहे.
डोंबिवली येथे होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विदर्भ संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी यांनी ५ ऑक्टोबर रोजी विदर्भ साहित्य संघाकडे बंद लिफाफा सुपूर्द केला होता. त्यात अर्ज असल्याचे सांगत त्यांनी १० ऑक्टोबरपर्यंत तो उघडू नये, अशी सूचनाही केली होती. ‘अर्जात आडनाव आधी की नाव आधी लिहावे, असा कोणताही नियम लिहिलेला नव्हता. छोट्याशा कारणासाठी अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून दोन्ही प्रकारे भरून बंद लिफाफ्यात वि. सा. संघाकडे सादर केला. माझे सूचक प्रा. सुरेश देशपांडे व अनुमोदक विंग कमांडर अशोक मोटे, डॉ. विनोद इंदूरकर, डॉ. ईश्वर नंदापुरे, डॉ. प्रज्ञा आपटे व डॉ. रमा लांबट यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून लिफाफा उघडू नका असा सूचना केल्या होत्या. त्यात कोणतेही राजकारण नव्हते’, असे डॉ. मदन कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीत रिंगणात डॉ. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे यांच्यासारखे खंदे उमेदवार रिंगणात असताना त्यांच्याशी काट्याची टक्कर देण्याची तयारी डॉ. कुळकर्णी यांनी चालवली असून १४ तारखेला विदर्भ साहित्य संघात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रचाराला प्रारंभ करण्याचा त्यांचा मानस आहे. मतदारांशी संवाद साधणे सुरू असून दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. कुळकर्णी यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट