‘आंबेडकर विचार’ या विषयात एम.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेतली जाते आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या अभ्यासक्रमाला मागील वर्षी प्रवेश घेतला होता व परीक्षा देखील दिली होती. बडोले यंदा या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला असून गेले काही दिवस या विषयाची परीक्षादेखील देत आहेत. त्यांना सक्करदरा येथील कमला नेहरू कॉलेज हे परीक्षा केंद्र मिळाले आहे.
मागील काही दिवस या अभ्यासक्रमाची परीक्षा देण्यात बडोले व्यस्त आहेत. सातत्याने परीक्षा केंद्रांवर जात त्यांनी ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेतील शेवटचा पेपर गुरुवारी पार पडला. दरम्यान, बडोले यांनी अत्यंत गंभीरपणे ही परीक्षा दिली असून सगळे पेपर त्यांनी शिस्तशीर विद्यार्थ्याप्रमाणे सोडविले आहेत. उपलब्ध कालावधीत पूर्णपणे पेपरवर लक्ष केंद्रित करून आपली परीक्षा देत असल्याचे कमला नेहरू परीक्षा केंद्रावरील सूत्रांनी सांगितले. बडोले परीक्षा देत असल्याची बातमी माध्यमांना मिळू नये, यासाठीदेखील काळजी घेण्यात आली होती. माध्यमांपर्यंत या परीक्षेबाबात कुठलीही खबर पोहोचू नये, अशा सूचना खुद्द बडोले यांनीच दिल्या होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट