सन २०११ च्या जनगणनेनुसार एकट्या नागपूर जिल्ह्यात विविध प्रवर्गांतील एक लाख १३ हजार ९४१ लोक दिव्यांग आहेत. यात कोणी अस्थिव्यंग, दृष्टिदोष, कर्णदोष, अंधत्व, अल्पदृष्टी असलेले तर कोणी मानसिकरित्या जन्मतः खचले आहेत. नियतीने जन्मतःच असे परावलंबित्व दिले. त्यात समाजाकडूनही फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे आत्मविश्वास गमावून बसलेल्या दिव्यांग बांधवांना पुन्हा एकदा स्वावलंबी करण्याचे मिशन आज, शुक्रवारपासून सुरू होणार आहे. पुढील ११ दिवस अशा दोन हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांना नव्याने जगण्याची उमेद मिळणार आहे.
अपंग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय मंत्रालय, महात्मा गांधी सेवा संघ आणि जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राच्या सहकार्याने हे मिशन हाती घेतले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागांतील दिव्यांग बांधवांना समान संधी देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून पुनर्वसन करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
भगवान महावीर विकलांग साहित्य समिती, जयपूर फूट्स, महापालिका, जिल्हा परिषद व नागपूर शिक्षण विभागाच्या संयुक्त सहकार्याने दिव्यांग बांधवांना जयपूर फूटपासून ते कॅलिपर्स, स्प्लिंट, कुबड्या, श्रवणयंत्रांसारखे साहित्य आणि अवयव मोफत वितरित होणार आहेत.
परावलंबित्वाचा दोष असणारे ७५ टक्के दिव्यांग व्यक्ती ग्रामिण भागात राहतात. घटनेने सर्वांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठा यांची ग्वाही दिली असली तरी सरकारच्या बहुतेक योजना व सवलतीचा लाभ अतिदुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तिपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे पात्र असूनही अशा व्यक्ती पुनर्वसनापासून वंचित राहतात. त्यामुळे जगण्याची उमेद हरवून बसलेल्या अशा दिव्यांग व्यक्तींना सर्व सुविधा राहत्या ठिकाणी पोहोचाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य व साधने मोफत उपलब्ध होणार आहेत. या शिबिरात अस्थिव्यंग, कर्णबधिर, प्रवर्गातीलच नव्हे तर जयपूर फुट कृत्रिम अवयव, साहित्य साधनांसाठी भगवान महावीर विकलांग साहित्य समिती, जयपूरने सढळ हाताने मदत केली आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
-अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
-रहिवासी दाखला
-दोन रंगीत पासपोर्ट साइज फोटो
-उत्पन्नाचा दाखला
-नुकताच काढलेला ऑडिओग्राम (फक्त कर्णबधिरांसाठी)
असा राहील कार्यक्रम...
१४ ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर शहर, उत्तर पूर्व नागपूर : १५० (एकूण साहित्य वितरण)
१५ व १६ ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर शहर दक्षिण, पश्चिम, मध्य : २००
१७ व १८ ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली तसेच नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी : २००
१९ व २० ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली तसेच रामटेक, पारशिवनी, मौदा : २००
२१ व २२ ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली तसेच उमरेड, कुही, भिवापूर : २००
२३ व २४ ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली तसेच काटोल, नरखेड, कळमेश्वर : २००
२५ ऑक्टोबर : यशवंत स्टेडियम, धंतोली तसेच सावनेर : १००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट