सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवरून, केंद्र सरकारने देशातील सर्व मनपाला हॉकर्स झोन धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेत मनपाने हॉकर्स समन्वय समिती स्थापली. त्यानंतर ३१ जुलै रोजी या समितीची बैठक झाली. त्यानंतर १ ऑगस्टला हॉकर्स नोंदणीला प्रारंभ झाला. मनपाने हॉकर्ससाठी ५० जागांची यादी करत त्यावर सूचना व हरकतीही मागविल्या. या यादीला अंतिम रूप दिले. यातील आठ जागांवर आक्षेप आल्याने त्यांना वगळले होते.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, वाहतूक पोलिस, नागरिक, हॉकर्सच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन केली. त्यानंतरही केवळ ४५०० हॉकर्सचीच नोंदणी झाली होती. ही संख्या जवळपास ३६ हजारांवर असल्याचे पुढे आले होते. निवासी भागात हॉकर्स झोन प्रस्तावित केल्यानेच आक्षेप आहेत. वाहतूक पोलिसांना प्रस्तावित ५० पैकी ४२ जागा अडचणीच्या वाटतात. तर, सीताबर्डी व्यापारी संघटनेने आक्षेप घेणारे ६० पत्र मनपाला दिले. खुद्द महापौरांनी आक्षेप नोंदवून खळबळ उडविली. बडकस चौकातील प्रस्तावित हॉकर्स झोनने महालातील नागरिक व हॉकर्सलाही मोठया अडचणींना सामोरे जावे लागेल, असा धोका वर्तविला आहे. हा भाग दटकेंच्या प्रभागात येतो. आधीच येथे हॉकर्स आहेत. त्यामुळे हा रस्ता ८० फुटांचा होतोय. अडचणींमुळेच रस्ता रुंदीकरण प्रस्तावित आहेत. त्याच रस्त्यावर हॉकर्स झोन प्रशासनाकडून प्रस्तावित झाल्याने महापौर संतापले आहेत. या जागेऐवजी केळीबाग रोडवर हॉकर्स झोन व्हा, अशी महालवासींची मागणी आहे. धरमपेठेतील ट्राफिक पार्कसमोरील गर्दी बघता येथील हॉकर्स झोनला भाजपच्याच नगरसेविका विशाखा मैंद यांनी विरोध दर्शविला आहे.
मार्च २०१७पर्यंत हॉकर्सचे सर्वेक्षण
नोंदणीकृत हॉकर्सचे सर्वेक्षण करून त्यांना परवाना देण्याचे काम मार्च २०१७ पर्यंत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. विदर्भ इन्फोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीला प्रति हॉकर्स २२८ रुपये याप्रमाणे सर्वेक्षण व नोंदणीची जबाबदारी दिली आहे.एजन्सीने मनपाच्या झोन क्र. १ ते १०अंतर्गत ३५९८० हॉकर्सचे सर्वेक्षण केले. यापैकी ३४८० हॉकर्सची नोंद झाली. प्रत्येक हॉकर्सकडून १ हजार रुपये नोंदणी शुल्क आकारायचे आहेत. यातील प्रतिहॉकर्स २२८ रुपये एजन्सीला मिळेल.
प्रस्तावित जागांना विरोध
नेताजी मार्केट, सीताबर्डी, टेम्पल बाजार रोड, अपना भंडार, बुटी हॉस्पिटल, जुने मॉरीस कॉलेज, मेडिकल चौकाजवळ, पाचपावली फ्लायओव्हर, गड्डीगोदाम गोल बाजार, इतवारी नंगा पुतला, रविनगर चौक, त्रिमूर्तीनगर मटन मार्केट, जरीपटका पोलिस ठाण्यासमोर, कळमना बाजार, महाल, बुधवार बाजार, तीन नल चौक, रामनगर, महाराजबाग चौक, प्रजापती चौक.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट