भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्मात प्रवेश घेऊन नवी क्रांती घडविली. या क्रांतीला नमन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने शुक्रवारी दीक्षाभूमीवर अवतरले. ‘दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन नको. तो १४ ऑक्टोबरलाच हवा’, असे मानणारे लाखोंच्या संख्येत देशात आहेत. बाबासाहेबांना मानणारे हीच तारीख समजून दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन करतात. शुक्रवारी परिसरात लाखोंच्या संख्येत असाच भीमसागर उसळला होता.
धम्मदीक्षा सोहळ्याच्या वर्धापनदिनानिमित्त शहर आणि विदर्भातील असंख्य बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमी गाठत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. या गर्दीने परिसर फुलून गेला होता. विशेष म्हणजे नागपूरकर कुटुंबीयांसह संपूर्ण दिवस दीक्षाभूमीवर घालवतात. यानिमित्ताने अनेक रॅलीही दीक्षाभूमीवर येत होत्या. तीनच दिवसांपूर्वी याच दीक्षाभूमीवर मोठा जनसागर उसळला होता. परिसर निळ्या व पंचशील झेंड्यानी सजलेला होता.
शुक्रवारीही परिसरात त्याच दिवसाची आठवण होत होती. मात्र, ही गर्दी काही वेगळाच संदेश देऊन बाबासाहेबांवर विश्वास दाखवित होती. परिसरात सर्वत्र पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध बांधव दिसत होते. सकाळपासून होणाऱ्या गर्दीमुळे बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी स्तुपाबाहेर दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. आजही नागपूर, विदर्भ व देशाच्या अनेक ठिकाणांहून आलेल्या हजारो अनुयायांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
१४, ऑक्टोबर १९५६ ला वंचित समाजाला धम्मदीक्षा देऊन बाबासाहेबांनी गुलामगिरीच्या जोखडातूत मुक्त केले होते. त्यांच्यामुळेच अस्पृश्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. शुक्रवारीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे निमित्त साधून दीक्षाभूमी परिसरात भीम आणि बुद्ध मैफल रंगली होती. उमेश बागडे आणि संच यांनी एकाहून एक अशी मधुर बुद्ध तसेच भीमगीते सादर केली. दसऱ्याला आलेल्या अनेक मंडळींनी आजही हजेरी लावत तारखांबद्दल असलेल्या आरोपांची खात्री करून घेतली. दीक्षाभूमी परिसरात येणाऱ्या भाविकांना ये-जा करण्यासाठी त्रास होऊ नये, म्हणून दुचाकी आणि चारचाकीच्या पार्किंगची परिसरात एका भागाला व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अनुयायांना व्यवस्थित दर्शन घेता आले.
परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने सजली होती. अनेक कुटुंबे आल्याने सर्व पिढ्यांचे प्रतिनिधी दीक्षाभूमीवर दिसत होते. अनेक दुकानांत बाबासाहेब आणि बुद्ध यांच्या मूर्ती विक्रीला होत्या. काही संघटनांतर्फे येणाऱ्या भाविकांसाठी भोजनदान आणि चहा, सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतील अनुयायी व कुटुंबीय मिळेल त्या वेळेत दीक्षाभूमीवर पोहोचण्याच्या लगबगीत दिसत होते. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट