म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा
विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त वर्धा जिल्ह्यात दोन लाख विद्यार्थी २२ लाख पुस्तके वाचणार आहेत.
हा दिवस कशा पद्धतीने साजरा करावयाचा याबाबत शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनेक सूचना दिल्या आहेत. राज्यभरात त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दोन लाख विद्यार्थी किमान दहा पुस्तके वाचणार असून त्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) के. झेड. शेंडे यांनी सांगितले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. २०२०मध्ये प्रगत भारताचे स्वप्न त्यांनी सर्व भारतीयांसमोर ठेवले. त्यामुळे देशात वैचारिक पातळीवर एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली. प्रगत भारताचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी शिक्षित, सुसंस्कारित होणे गरजेचे आहे. वाचनामुळे विचारांना चालना मिळते, मनावर संस्कार होतात, चांगले वाईट यातील भेदाभेद स्पष्ट होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून राबविण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्यासाठी शाळा, कॉलेजेसनी आपल्या परिसरात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कट्टा निर्माण करावा. समाज सहभागातून शाळेत पुस्तके गोळा करून पुस्तकपेढी तयार करावी अशा सूचना शाळा, महाविद्यालयाना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना पत्राने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात पाहुण्यांना पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक भेट देण्याच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट