शहरातील सर्वात मोठा मॉल, अशी ओळख असलेल्या एम्प्रेस मॉलसंबंधीच्या तक्रारी आता नव्या राहिलेल्या नाहीत. मात्र, शनिवारी 'विक एंड'ला भर गर्दीच्यावेळी मॉलच्या सिलिंगचे पीओपी कोसळ्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली. तरी, यानिमित्ताने मॉलमध्ये येणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियम तोडणे आणि त्यामुळे नोटीस प्राप्त करणे, असा या मॉलचा इतिहास आहे. सध्याही या मॉलचे एक प्रकरण हायकोर्टात प्रविष्ठ आहे. त्यानिमित्ताने या मॉलचा घेतलेला हा आढावा.
बांधकामावर मनपाची हरकत
या मॉलमध्ये केएसएल इंडस्ट्रीजने काही बांधकाम सुरू केले. त्यावर मनपाने हरकत घेतली होती. याप्रकरणी केएसएल इंडस्ट्रीजने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टानेसुद्धा याप्रकरणी जैसे थे आदेश देऊन मनपाला उत्तर दाखल करण्याकरिता आदेश दिले होते. त्यामुळे मनपाला अद्याप हे बांधकाम तोडण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. परंतु हे बांधकामसुद्धा सध्या थांबलेले आहे, हेही तेवढेत खरे.
मॉल असुरक्षितच
नोव्हेंबर २०१५मध्ये गुन्हे शाखेने शहरातील १०५ धोकादायक जागांची यादीच तयार केली होती. नागरिकांचे फारसे येणे-जाणे नसणे, तसेच परिसरातील वस्त्या सुरक्षित नसल्याने अशी ठिकाणी नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या १०५ जागांमध्येही एम्प्रेस मॉलचा समावेश होता, हे विशेष.
आगीची घटना
२०१४मध्ये एम्प्रेस मॉलमधील लाइफ स्टाइल शोरुममध्ये मध्ये आग लागल्याची घटनाही घडली होती. ही आग पहाटे अडीच ते तीन वाजताच्या सुमारास लागल्याने सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. परंतु, हीच आग दिवसा लागली असती, तर ती नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा बराच त्रास झाला असता.
पार्किंगकरिता नोटीस
या मॉलच्या पार्किंगबाबतसुद्धा वाद निर्माण झाले होते. २०१३मध्ये वाहतूक शाखेचे तत्कालीन सहायक आयुक्त महादेव गावडे यांनी या मॉलला नोटीस बजावली होती. पुढे व्यवस्थापनाने पार्किंगच्या अटींची पूर्तता केली. या मॉलमध्ये असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी जनरेटर्स ठेवण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी स्टोअर रुम्स तयार करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मॉलला नोटीस बजावण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर या मॉलच्या वरच्या मजल्यांवरसुद्धा पार्किंगकरिता जागा दाखविण्यात आली होती. परंतु, तेथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
मनपातर्फे 'पाणी कट'
विविध विभागांतर्फे नोटीस प्राप्त करणे हा या मॉलचा इतिहास आहे. मनपा, अग्नीशमन विभाग, पोलिस विभाग, नगररचना या सर्व विभागांनी या मॉलला नोटीस बजावलेल्या आहेत. या मॉलने मनपाचे पाण्याचे देयक थकविले होते. अनेकदा नोटीस बजावूनसुद्धा व्यवस्थापनाने पैसे न भरल्याने शेवटी मॉलच्या पाण्याची जोडणी तोडली होती. पुढे देयक अदा केल्यानंतर पाणी जोडणी पूर्ववत करण्यात आली. धंतोली झोनतर्फेसुद्धा विविध कारणांकरिता नोटीस बजावण्यात आली होती. अग्नीशमन विभागानेसुद्धा या मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. पुढे मॉल प्रशासनाने अटींची पूर्तता केली.
व्यवस्थापन अनुपलब्ध
केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमीटेडने एम्प्रेस सिटी आणि हा मॉल तयार केला आहे. या मॉलच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट