मराठा समाजाच्या विविध मागण्यांकरिता नागपुरात आयोजित मोर्चा आयोजनाच्या तारखेचा वाद आता पोलिसांत गेला आहे. प्रवीण मोहिते या व्यक्तीने २५ ऑक्टोबरच्या मराठा मोर्चाच्या आयोजनावरून राजे मुधोजी भोसले यांच्याविरुद्ध अपशब्दांचा वापर केल्याची तक्रार भोसले समर्थकांनी पोलिसांत करून मोहिते यांना स्थानबद्ध करण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
याप्रकरणी पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, मोहिते यांनी १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजक राजे मुधोजी भोसले यांचे समर्थक शिरीष शिर्के यांना फोन केला. त्यावेळी शिर्के यांनी मोहितेंचा फोन रेकॉर्ड केला. मोर्चा कोणत्या तारखेला काढायचा यावरून झालेल्या वादात मोहिते यांनी भोसले यांच्याविरुद्ध अपशब्दांचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे शिर्के यांनी मोबाइल संभाषण भोसले यांच्यासह इतर समर्थकांना ऐकविले व त्याची पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली. त्यावरून, मराठा समाजात मोर्चा आयोजनावरून फूट पडली असून भोसले यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने समाजात रोष निर्माण झाला आहे. त्यास्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा मोहिते यांना १५ दिवसांकरिता स्थानबद्ध करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर रविवारी सुनावणी झाली. यावेळी मोहिते यांचे वकील अॅड. अमोल जलतारे यांनी पोलिसांनी केलेल्या मागणीचा विरोध केला. कथित फोनवरील संभाषण शिर्के आणि मोहिते
यांच्यातीलच होते. ते संभाषण शिर्के यांनीच सार्वजनिक केले. त्यामुळे समाजात रोष निर्माण होण्यास शिर्के कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे मोहिते यांना स्थानबद्ध करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे अॅड. जलतारे यांनी नमूद केले. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट