दूरवरचे अंतर ठरवून सायकवर प्रवास करीत ते नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा साहसी सायकल स्पर्धेचा प्रकार हळूहळू विदर्भात रुजत आहे. या साहसी सायकल स्पर्धेत देशातल्या आजवरच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याचा तिहेरी योग रविवारी नागपुरात जुळून आला. संपूर्ण वर्षभरात २००, ३००, ४०० आणि ६०० कि. मी.चे अंतर पार करीत हैदराबादचा सायकलवीर साई रामा कृष्णा याने ३९ तासांत हा विक्रम आपल्या नावावर नोंदविला.
साईने हे अंतर वर्षभरात एक-दोन वेळा नव्हे तर चक्क सहावेळा सायकलवरून नियोजित वेळेच्या आत पूर्ण केले आहे. अशा प्रकारची कामगिरी नोंदविणारा तो देशातील पहिला साहसी सायकलपटू ठरला आहे. तर डॉ. भूपेंद्र आर्या हे पुन्हा एकदा सर्वात ज्येष्ठ साहसी सायकलपटू ठरले
आहेत. नागपुरातून राजेश चनसोरीया यांनीदेखील एकाच वर्षात सुपर रॉँदेनियर्स हा खिताब मिळविला आहे. नागपूरच्या सायकल विश्वात हा देखील विक्रम आहे.
फ्रान्समधून सुरू झालेला हा साहसी सायकल क्रीडाप्रकार अर्थात ब्रेव्हे विदर्भातील क्रीडा विश्वात नवनवे उच्चांक गाठत आहे. एकाच वर्षात २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचा साहसी सायकल प्रवास केल्यानंतर सुपर रॉँदेनियर्सचा किताब मिळतो. हैदराबाद येथील साई रामा कृष्णाने यापूर्वी चालू वर्षांत पाचवेळा असा पराक्रम नोंदविला आहे. यावर्षातील सहाव्यांदा ६०० किलोमीटरची ब्रेव्हे शिल्लक राहिल्याने त्यांनी नागपूरची निवड केली. शनिवारी सकाळी ५ वाजता या साहसी सायकल स्पर्धेला झिरो माइल येथून सुरुवात झाली. बाजारगाव, कोंढाळी मार्गे अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, वाशीम, मालेगांव आणि परत याच मार्गाने नागपूर असा हा साहसी सायकल प्रवासाचा टप्पा ४० तासांच्या नियोजित वेळेत स्पर्धकांना गाठायचा होता. साई रामा कृष्णा याने हे अंतर नियोजित वेळेत करीत सहाव्यांदा सुपर रॉँदेनियर्सचा किताब पटकावत देशातील पहिला साहसी सायकलपटूचा मान मिळविला. तर नागपुरातून राजेश चनसोरिया यांनीदेखील एकाच वर्षात दोन वेळा असा किताब पटकावला आहे.
डॉ. आर्यादेखील नोंदविणार विक्रम
डॉ. भूपेंद्र आर्या या ७३ वर्षीय साहसी सायकलपटूने गेल्यावर्षी २०० कि.मी.चे अंतर पार करीत सर्वांत ज्येष्ठ सायकलपटू म्हणून मान मिळविला होता. यंदादेखील त्यांनी हे अंतर नियोजित वेळेत पूर्ण करून आपला विक्रम कायम राखला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट