लग्न म्हणजे सातजन्माचा प्रवास... रुसणे-फुगणे हे संसारात चालायचेच. मात्र, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दाम्पत्यांची संसाराची नाव लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच डुबक्या मारायला लागली आहे. सासू-सासऱ्यांचा अनावश्यक हस्तक्षेप, मोबाइलमुळे निर्माण झालेले गैरसमज आणि इगो यामुळे कुटुंब न्यायालयातील खटल्यांची संख्या वाढली असल्याची चिंता कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली. ‘इगो टाळा, संसार टिकवा’, असा सल्लाही त्यांनी दिला.
गोविंदराव वंजारी लॉ कॉलेजच्यावतीने ‘भारतातील कुटुंब कायदा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश आय. एम. बोहरी, पी. के. अग्निहोत्री, प्राचार्य डॉ. स्नेहल फडणवीस, डॉ. शेखर पांडे, अॅड. विजय देशपांडे, अॅड. शर्मिला चारलवार, डॉ. सुहासिनी वंजारी, अॅड. अभिजित वंजारी, हनिफा शेख, डॉ. अर्चना सुके आदी उपस्थित होते.
पूर्वी पती कामानिमित्त घराबाहेर पडायचा आणि पत्नी घरातील स्वयंपाकापासून सर्व कामे करायची. त्यामुळे त्यावेळच्या घटस्फोटाची कारणेही वेगळी होती. आज जीवनशैली बदलली आहे. संपर्काची साधने वाढली. पतीच नाही तर पत्नीकडेही मोबाइल असून इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर तीही तेवढीच सक्रिय झाली आहे. मात्र, संपर्काचे प्रभावी साधन असलेल्या याच मोबाइलने आज पती-पत्नींना खऱ्या संपर्कापासून दूर केले असून त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशी खंत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली. इगो टाळून संसार करण्याचा सल्लाही या चर्चासत्रातून देण्यात आला.
सासू-सासऱ्यांचा हस्तक्षेप वाढला
कुटुंबामध्ये पती-पत्नी, आई-वडील असा संपूर्ण परिवार असला तरी कुणाचाही अधिक हस्तक्षेप नात्यात कडवटपणा आणू शकतो. कुटुंब न्यायालयात दाखल होणाऱ्या अनेक खटल्यांमध्ये मुलीकडीलही सासू-सासऱ्यांचा अनावश्यक हस्तक्षेप कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे छोट्या गोष्टी मोठ्या होऊन संसार कोलमडून पडण्यापूर्वीच सावरायला हवेत. गैरसमज निर्माण होऊ न देता नात्यात अधिक पारदर्शकता निर्माण करावी, अशी गरज या चर्चासत्रातून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. केवळ कायद्याची माहिती असूनच चालणार नाही तर बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाची माहितीही वकिलांनी ठेऊन स्वतःला अपडेट ठेवण्याची गरज असल्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट