भंडारा परिसरातील वाढत्या मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असतानाच गुन्हे शाखेने चोरट्यांना अटक करीत प्रश्न निकाली काढला. पण, पोलिस विभागातील एका शाखेच्या या घटनांमागच्या अपयशाचीच चर्चा अधिक रंगली. हागणदारीमुक्तीचा पुरस्कार मिळविणाऱ्या भंडारा नगर परिषदेने शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ करावा, खासदार नाना पटोले यांच्यातील धानाचा कैवारी पुन्हा कधी दिसावा, अशा आशाही व्यक्त झाल्या.
भंडारा पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या सराईत चोरांचा छडा लावला. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. भंडारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हे गुन्हे होत होते. परंतु भंडारा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते शोधूनसुद्धा सापडले नाहीत. दिवसागणिक चोरीचे प्रकार वाढतच होते. शेवटी या चोरांना शोधून काढण्याचे प्रकरण पोलिस अधीक्षकांच्या अखत्यारीतील स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आणि आठवड्याच्या आत चोरांना शोधून काढण्यात आले. सुमारे पाच लाख सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. याशिवाय तुमसर, गोंदिया येथील चोऱ्याही समोर आल्या. पोलिसी कारवाईचे कौतुक झाले. पण, एकाच विभागातील पोलिसांच्या एका शाखेला यात का अपयश आले, याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
भंडारा, तुमसर नगर परिषदेला हागणदारीमुक्त शहरासाठी असणारे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. नेते, प्रशासनाने आपली पाट थोपटून घेतली. पण, हागणदारीमुक्त आणि भंडारा शहर हे समीकरणच बसत नाही. शहराच्या झोपडपट्टी हागणदारीमुक्त होणे हा मापदंड आहे. गरिबांच्या या वस्त्या हागणदारीमुक्त झाल्यास शहर सुधारले असे समजले जाते. मुळात झोपडपट्टीतील ही लोक शौचालय बांधण्यासाठीचा खर्च करू शकत नाहीत. सरकार विशेष अनुदान देत असले तरी त्यामधून वैयक्तिक शौचालये बांधली जातात. भंडाऱ्यातही अशी शौचालये बांधली गेली. त्यापैकी बरीचशी अर्धवट तर काही बांधूनही वापरण्याजोगी राहिलेली नाहीत. अनुदानाची रक्कम अपुरी मिळाल्याने बांधकाम अपूर्ण असल्याचाही आरोप आहे. परिणामी लोकांचे उघड्यावर शौचास जाणे सुरूच आहे. पुरस्कार मिळवून पाट थोपटून घेणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. शहराचा बकालपणा घालविण्यासाठी शहर
खऱ्या अर्थाने हागणदारीमुक्त करणे आवश्यक आहे.
सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सची चलती आहे. म्हणूनच नेत्यांनी या माध्यमातून आपल्या कामांची प्रसिद्धी सुरू केली आहे. खासदार नाना पटोले हेदेखील याला अपवाद नाहीत. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या समस्यांविषयी त्यांनी चर्चा केली. त्याचे फोटो व्हॉटस्अॅॅपवर फिरले. आता पटोले यांनी केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीवप्रताप रूढी यांच्याबरोबर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण याबद्दल सखोल चर्चा केली. पुन्हा व्हॉटस्अॅॅपवर फोटो फिरले. जिल्ह्यातील समस्यांची दिल्लीत चर्चा होणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पण, या चर्चांतून निष्पन्न काय, हा प्रश्न कायम आहे. धानासाठी लढा देणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ख्याती आहे. त्यांनी काढलेले मोर्चे आजवर गाजले. सत्तेत आल्यानंतर धान उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला असतानाही त्यांनी चक्कार शब्दही काढला नाही. यंदाही धानाचे भाव कोसळलेलेच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पटोले यांनी मुद्द्याकडे लक्ष देत व्हॉटसअॅपवर त्याचे फोटो फिरवावे, असा आशावाद धान उत्पादक व्यक्त करीत आहेत.
शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांनी ७५ वर्षांपूर्वी स्थापन केलेली राष्ट्रीय शिक्षण संस्था ही संघ विचारांनी प्रेरित असलेली विदर्भातील प्रथम संस्था. या संस्थेचा वटवृक्ष झाला. संस्थेचे समर्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ही नागपूर विद्यापीठातील प्रतिष्ठीत संस्था. मात्र संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षातच तिची अधोगती सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट