शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हा वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधा आणि गैरसोयींना मंत्रालय जबाबदार आहे. त्या पूर्ण करण्यात मंत्रालय सपशेल अपयशी ठरत असल्याचा संताप व्यक्त करीत युवक कॉँग्रेसने सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री व पर्यायाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे प्रवेशद्वारावरच दहन केले.
मेडिकलमधील सिटीस्कॅन, रेडिओथेरेपी उपकरण सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे अपघाती रुग्ण आणि कर्करोग रुग्णांचे हाल होत आहेत. या मुद्यावरून युवक कॉँग्रेसने दोन दिवसांपूर्वी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना घेराव घालत ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, ही उपकरणे दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. तो करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे कारण देत अधिष्ठातांनी मंत्रालयाकडे बोट दाखविले होते. दुसऱ्या बाजूला येथील वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या चादरी, बेडसीट आणि ब्लॅँकेट मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. दोन दिवसांनंतरही या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे संतापलेल्या युवक कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी महासचिव कुणाल पुरी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. मेडिकलच्या प्रवेशद्वारावरच घोषणाबाजीत झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी योगेश तिवारी, समीर काळे, आसिफ अंसारी, अजहर शेख, इब्राहिम पठाण, सूरज चौकीकर, बंटी कांबळे, अमोल गजभिये आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट