स्पर्धेमुळे जगभर मानसिक आजार चिंतेचा विषय ठरत आहे. भारतही त्यात मागे नाही. देशात दरशेकडा सहाजण या व्याधीने ग्रस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. वयाच्या कोणत्याही वर्षी हा आजार दार ठोठावत असल्याने मनोरुग्णांच्या वाढत्या संख्येवर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (हू) धोक्याची घंटा दिली आहे. वैफल्यग्रस्तांच्या भावनांचा कानोसा घेऊन त्यावर वेळीच इलाज केला नाही तर येत्या आठ वर्षांत मानसिक आरोग्य हा जगाच्या प्रमुख तीन आजारांमध्ये गणला जाण्याचे संकेतही ‘हू’ने दिले आहेत. नागपुरातही या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात डॉक्टरी सल्ला घेत असल्याचे दिसून आले आहे.
मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात १० ऑक्टोबरपासून मानसिक आरोग्य निर्मूलन व जागृती मोहीम आयोजित केली जाते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या इशाऱ्यामुळे जगभरातील मानसोपचारतज्ज्ञांचे कान आणखीनच टवकारले गेले आहेत. वैद्यकीय परिभाषेत ढोबळमानाने स्किझोफ्रेनिया, नैराश्य, चिंतारोग, व्यसनाधीनता असे मानसिक अनारोग्याचे प्रमुख चार प्रकार सांगितले जातात. याखेरीज वयाच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या या मानसिक आरोग्याचे आणखीही प्रकार आहेत. लहान वयातल्या काही मुलांमध्ये सामान्यपणे चीडखोरपणा, नैसर्गिक क्रियांवर ताबा नसणे, एकाग्रतेचा अभाव दिसतो. हीदेखील मानसिक अनारोग्याची पहिली पायरी सांगितली जाते. तर तारुण्यातल्या मानसिक असंतुलनात नैराश्य, एकलकोंडेपणा, व्यसनाधीनता, संशयी वृत्ती बळावणे, अशी लक्षणे दिसून येतात. उतारवयात स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन्स या अवस्थेत रुग्ण मानसिकदृष्ट्या खचतो.
या संदर्भात दुजोरा देताना ज्येष्ठ मानसोपचातज्ज्ञ डॉ. सुधीर भावे म्हणाले, ‘स्किझोफ्रेनियात वैचारिक, भावनिक आणि वागणूक या तीनही घटकांत विचित्र बदल होतो. माणसाला लॉजिकली विचार शक्य होत नाही. वस्तुस्थिती आणि कल्पनेतील भेद कळत नाही. भावनिक प्रतिक्रिया देता येत नाही. सामाजिक वर्तणुकीप्रमाणे त्यांना सर्वसामान्यांसारखे वागता येत नाही. यामुळेच स्किझोफ्रेनिया हा वेडेपणाचा आजार आहे, असे वाटते. तर नैराश्यात सतत नकारात्मक विचार घोळत राहतात. यातून अनेकदा रुग्ण आत्महत्यांचेही मार्ग निवडतात. मानसिक आजारात मेंदूतील न्युरोट्रान्समीटर रसायनाचे संतुलन बिघडते. स्किझोफ्रेनियात डोपामाईनचे प्रमाण वाढते. तर डिप्रेशनमध्ये सिरोटोनिन व नॉरअॅड्रीनालीन कमी होते. आनुवंशिकता, सभोवतालची परिस्थिती, तणाव, व्यसनाधीनता, मानसिक आघात अशी कारणे या आजारांमागे असू शकतात.’
मानसिक आरोग्याची वस्तुस्थिती
देशात साधारण १ कोटी लोकांना स्किझोफ्रेनिया
६० टक्के रुग्णांना नैराश्य उपचारांनी कमी होते, हेच लक्षात येत नाही
स्किझोफ्रेनियाचे प्रमाण एपिलेप्सीएवढे
बहुतांश रुग्णांना ऐन तारुण्यात विळखा.
स्किझोफ्रेनियात स्त्रियांचे सरासरी वय २९ टक्के; हेच प्रमाण पुरुषांत २५ टक्के
मनोरुग्णाची लक्षणे
दैनंदिन व्यवहार, नोकरीत इंटरेस्ट कमी होणे
स्मरणशक्ती, निर्णयक्षमतेवर परिणाम
वैचारिक गोंधळ, भ्रम व भास
समोरची व्यक्ती आपल्याविषयी बोलते, वाईटावर आहे, अशी भीती
आक्रस्ताळेपणा
दुसऱ्यावर निराधार संशय
अवास्तविक विचार
कोणाचातरी वॉच असल्याचे भास (वैद्यकीय भाषेत हॅलोसनेशन म्हणतात)
लहान मुलांसारखे वागणे.
एखाद्या ठिकाणी बसून एकटक पाहणे.
मनोरुग्णाची लक्षणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट