शहरातील परिवहन सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अंतर्गत ४ ऑपरेटर्सकडून ४८७ बस नव्याने रस्त्यावर आणण्यात येणार असून सहा वर्षासाठीचा हा करार राहणार आहे. गुरुवार, २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ठरावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे लवकरच जुन्या ऑपरेटर्सचे काम संपुष्टात येणार आहे.
नवीन ऑपरेटर्स नेमताना मनपा त्यासाठी स्वतंत्र इस्क्रो खाते उघडणार असून, दैनंदिन खर्च व देखभालीसंदर्भात भविष्यात अडचण येऊ नये, यासाठी तरतूद करणार आहे. सोबतच ग्रीन बस, मिनी व मिडीबसही शहरातील रस्त्यांवरून धावेल. मनपा त्यांच्या मालकीची जेएनएनयूआरएममध्ये मिळालेल्या स्टँडर्ड बस ऑपरेटर्सला देईल. सोबतच ऑपरेटर्सला नवीन बसेसही खरेदी कराव्या लागणार आहेत. आगामी काळात स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वेच्या धरतीवर शहरातील भूतल परिवहन सेवा अधिक लोकाभिमुख करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
शहरात ५५ नवीन वातानुकुलित ग्रीन बस, ३ डिझेल बस ऑपरेटर्सच्या एकूण १४४ बस तसेच मनपाच्या २३७ स्टँडर्ड बस, ५० नवीन मिडीबस व १५ मिनीबस, असे एकूण ४ ऑपरेटर्सकडून ४८७ बसचे संचालन होणार आहे. या संपूर्ण वाहतुकीचे व्यवस्थापन इंटिग्रेटेड बस ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट दिल्ली (आयबीटीएम) या ऑपरेटर्सद्वारे करण्यात येणार आहे. यासोबतच बस संचालनाची तिकीट व रोकड कार्यप्रणाली तसेच इटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टमद्वारे संपूर्ण नियंत्रण व देखरेख राहणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट