२०१५-१६ च्या संचमान्यतेमुळे शिक्षक आणि शिक्षण अशी दोघांचीही दुर्दशा केली असून ही संचमान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे. शासनाच्या तिजोरीतील पैसा वाचविण्यासाठी व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी शिक्षक संचमान्यता करण्यात आली असल्याची टीकाही गाणार यांनी केली आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील २०१५-१६ या वर्षाची शिक्षक संचमान्यता २८ ऑगस्ट, २०१५ व ८ जानेवारी, २०१६ च्या आदेशानुसार करण्यात आली. या शिक्षक संचमान्यतेमुळे अनेक शाळांना मुख्याध्यापकाचे पद उपलब्ध झाले नाही. मुख्याध्यापकाशिवाय शाळा ही कल्पना अव्यवहार्य असून शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेच्या दृष्टीने घातक आहे. या संचमान्यतेने विशेष शिक्षकांचे अस्तित्व संपुष्टात आणले आहे. वर्ग किंवा तुकडीनिहाय संचमान्यता निश्चित न करता वर्ग एक ते पाच आणि सहा ते आठ मधील एकूण विद्यार्थी संख्येच्या आधाराव मान्य केल्या आहेत. त्यामुळे, वर्ग व तुकड्या अधिक आणि शिक्षक संख्या कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्ग व तुकडीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक स्वतंत्र असताना त्या कार्यभाराच्या आधारावर शिक्षक संख्या मान्य न केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात दुर्दशा झाली असल्याचे गाणार यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी चिंताग्रस्त आहेत. समाजात शासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे, संचमान्यात तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अध्यक्षा पूजा चौधरी, कार्यवाह सुभाष गोतमारे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे गाणार यांनी हे निवेदन दिले आहे. नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांकडे हे निवेदन देण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट