शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ट्रॉमा युनिटचा ड्रामा पुन्हा रंगात आला आहे. एकीकडे ट्रॉमाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. तर दुसरीकडे बुधवारी होणाऱ्या ट्रायलचादेखील प्रयोग फसला आहे. त्यामुळे आता ट्रॉमा सुरू करण्यासाठी प्रशासनाला प्रशिक्षणाचा अंक सुरू करावा लागणार आहे.
त्यासाठी आज गुरुवारी डॉक्टर, परिचारिका, परिचर, सफाईकामगारांसह आवश्यक सर्व कर्मचाऱ्यांना ट्रॉमा केअर सेंटर सेवेत दाखल करत असताना काय काळजी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर युनिटच्या उद्घाटनाचा चेंडू वैद्यकीय संचालक कार्यालयातून खेळवला जाणार आहे. स्थानिक पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि ट्रॉमा सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी चाचपणी करून ट्रॉमामध्ये उपचाराचा किल्ला कसा लढवला, जाईल याचे प्रशिक्षण बुधवारपासून सुरू केले होते. परंतु, ऐनवेळी ट्रॉमाचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी ट्रायलसाठी गुरुवारी येणार असल्याचे सांगितले.
अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यूच्या दारातील तीन रुग्णांना 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळवून देण्यासाठी आणि जीव वाचवण्याच्या हेतूने ट्रॉमा युनिट रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे. दोन शल्यचिकित्सा गृह, १० मॉनिटर, कुठेही फिरवू शकता येतील असे ३० मोटराइज्ड बेड, सात व्हेंटिलेटर, दोन आयसीयू आणि या सर्वांवर मॉनिटर करणारे यंत्र तातडीने ट्रॉमाच्या सेवेत दाखल झाले आहेत.
३० खाटांच्या ट्रॉमासाठी भूलतज्ज्ञ, हृदशल्यचिकित्सक, गॅस्ट्रो इंट्रॉलॉजिस्ट, युरॉलॉजीस्ट, अस्थिरोग शल्यचिकित्सक, सामान्य शल्यचिकित्सकांना बुधवारी प्रशिक्षण दिले जाणार होते. परंतु, ओटीमध्ये आणखी काही बदल आवश्यक होते. त्यामुळे आता गुरुवारपासून ट्रायल सुरू होईल, असे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट