नागपूर : मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातील पोलिस भरतीतील लेखी परीक्षेचा पेपर 'बी' सेट प्रकरण चांगलेच तापले असून, बुधवारी अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले. तरवडे यांच्यासह अन्य दोन उपायुक्तांकडेही या भरतीची जबाबदारी होती. याशिवाय दोन उपायुक्तांनी पेपरची पाहणी केली होती. तरवडेंना आताच का कार्यमुक्त करण्यात आले. अन्य अधिकाऱ्यांचा या प्रकरणात काहीही दोष नाही का? त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार? याकडे आता उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीपासूनच शहर पोलिस दलातील भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. सर्वप्रथम १९ एप्रिलला पोलिस भरतीतील घोळ चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. २२ एप्रिललाही घोळ झाला. हा घोळात घोळ झाल्यानंतर १० मे रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. या दिवशीही परीक्षा रद्द झाली. त्यानंतर मंगळवारी १७ मे रोजी लेखी परीक्षा झाली. मात्र लेखी परीक्षेचा बी सेट पेपरच सेट झाल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी तांत्रिक चूक झाल्याचे सांगून हात वर केले होते. परंतु या प्रकाराने उमेदवारांच्या संयमाचा भडका उडाला. शेकडो उमेदवारांनी पोलिस आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. तणाव निर्माण झाला होता. पोलिस आयुक्त एस.पी.यादव यांनी उमेदवारांच्या शिष्टमंडळाला योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट