मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील त्रिमूर्तीनगर भागातील आदर्श कॉलनीतील जागा आता स्वच्छ होत आहे. इस्पितळाच्या या जागेसमोरच मोठ्या कचराकुंड्या असल्याचा मुद्दा ‘मटा’ने याच सदराद्वारे मांडला होता. त्याची दखल घेत महापालिकेने या कुंड्या किमान रस्त्यावरून उचलल्या आहेत. यामुळे इस्पितळासाठी राखीव जागा त्यासाठी मार्गस्थ होत असल्याची आशा निर्माण झाली आहे.
सन १९७०पर्यंत महाल, इतवारी, बर्डी या भागांपुरते मर्यादित असलेले नागपूर शहर त्यानंतर पश्चिम नागपूरकडे वाढू लागले. त्यानंतर १९८०च्या दरम्यान सध्याच्या दक्षिण-पश्चिम व तत्कालीन पश्चिम नागपुरातील स्वावलंबीनगर, त्रिमूर्तीनगर या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती वाढू लागली. जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांनी येथे निवासी संकुले उभी केली. याचवेळी आदर्श कॉलनी ही वस्ती तेथे उभी झाली. याच वस्तीत गजानन महाराज मंदिर असून तेथे भाविकांची मोठी गर्दी असते. पण, आतापर्यंत या मंदिराच्या शेजारील जागा दुर्गंधीचे केंद्र होते. ते काही प्रमाणात स्वच्छ झाले आहे.
या आदर्श कॉलनीत नागपूर सुधार प्रन्यासची जागा आहे. अनेक वर्षांपासून ती जागा मोकळी आहे. त्यात कुंपणदेखील नसल्याने परिसरातील अनेक जण या मोकळ्या जागेचा कचरा टाकण्यासाठी उपयोग करतात. दगड, माती, कचरा आणि घाण यांचे माहेरघर झाल्यासारखी स्थिती आहे. यांत भरीस भर म्हणजे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीदेखील परिसरातील कचरा तेथे आणून टाकतात. कचरा टाकण्यासाठी दोन मोठ्या कचराकुंड्या आतापर्यंत या मोकळ्या जागेसमोरील रस्त्यावरच होत्या. तर या कचराकुंडीतील कचरा बाहेर पडलेला असायचा. गायी, गुरे, कुत्री तेथे सतत असायची. याचा मोठा अडथळा वाहनांना होत होता. तसेच यामुळे परिसरात दृर्गंधीदेखील पसरत होती. हा विषय ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने मांडला. त्याची दखल घेत किमान रस्ता मोकळा झाला आहे.
महापालिकेने अलीकडेच या मोकळ्या जागेसमोरील रस्त्यावर असलेल्या कचराकुंड्या उचलल्या. रस्त्यावर पडणारा कचरादेखील उचलण्यात आला आहे. यामुळे तो भाग आता स्वच्छ झाला आहे. शेजारीच असलेल्या मंदिरात येणाऱ्या भक्तांनादेखील याचा दिलासा मिळाला आहे. आता सध्या या कचराकुंड्या इस्पितळाच्या जागेत आंत नेल्या आहेत. तरीही स्वच्छतेच्या दिशेने हलके पाऊल उचलले गेले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट