नक्षलग्रस्त म्हणून राज्यात कुप्रसिद्ध गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचा वेढा आहे. या भागातील आदिवासींमध्ये आरोग्याच्या नानाविध समस्या आजगी उग्र रूपाने समोर येतात. त्यात सिकलसेलचा समावेश आहे. त्यात आणखी एका कमतरतेची भर पडल्याचे समोर येत आहे. या भागातील माडिया गोंड समाजातल्या सिकलसेल व्याधीग्रस्तांमध्ये ड जीवनसत्वाचा देखील अभाव प्रकर्षाने दिसून आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या डॉ. संजना जयस्वाल यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या डॉ. जयस्वाल यांची या संशोधनाबद्दल लंडन येथे अलीकडेच झालेल्या जागतिक परिषदेतही दखल घेण्यात आली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण घेत असलेल्या डॉ. जयस्वाल या अशी दखल घेतली गेलेल्या पहिल्या विद्यार्थीनीच्या पंक्तीत जाऊन बसल्या आहेत. लंडन येथे अकादमी ऑफ सिकलसेल अॅँड थेलेसेमियाच्या वार्षिक परिषदेत हा संशोधन प्रकल्प निवडण्यात आला. जगभरातील २७ देशांतील प्रतिनिधींनी यात भाग घेतला होता. त्यात भारताकडून डॉ. जयस्वाल यांनी संशोधन निबंध सादर केला. आजवर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी संधी मिळाली नव्हती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यातून गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजातील सिकलसेलव्याधीग्रस्तांवर हा अभ्यास करण्यात आला. यासाठी साधारणपणे ५ ते १८ वयोगटातील २०१ सिकलसेल व्याधीग्रस्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ६३ टक्के सिकलसेलव्याधीग्रस्त स्त्रियांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव असल्याचे आढळले. तर ३७ टक्के पुरुष रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असल्याचे संशोधनातून समोर आले. विशिष्ट समाजातील व्याधीग्र्रस्तांना भेडसावणाऱ्या शारीरिक समस्येवर करण्यात आलेले पहिलेच संशोधन ठरले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट