Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

गुणवान शिक्षक आणणार कुठून?

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

‘बी.एड. किंवा डीएलएडसारख्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी ओढून आणावे लागत आहेत. चांगले गुणवंत विद्यार्थी या अभ्यासक्रमांना मिळत नाहीत. त्यामुळे, येत्या काळात ‌शिक्षणाचे भविष्य कसे असेल हे सांगता येत नाही’, अशा शब्दांत राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी राज्यातील शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्यावतीने मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बीआरए मुंडले शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेत नागपूर जिल्ह्यातील शेकडो माध्यमिक शाळांचे ‌मुख्याध्यापक उ‌पस्थित होते. यावेळी जरग यांनी माध्यमिक शिक्षणाशी संबं‌धित विषयांना यावेळी स्पर्श केला.

पालकांना इंग्रजी शिकवणाऱ्या शाळा हव्या आहेत. त्यामुळे, मराठी शाळांमधूनही चांगले इंग्रजी शिकवले जावे. इंग्रजी शाळांमधून अनेक मुले मराठी शाळांमध्ये येत आहेत. मराठी शाळांमध्ये विद्यार्थी घेऊन येणाऱ्या शिक्षकांचा येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्कार केला जाणार आहे.

दहावीचा निकाल शंभर टक्के लावणाऱ्या सर्वाधिक शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. तेथे अशा शाळांची टक्केवारी ४६ टक्के असून नागपुरात ती केवळ १६ टक्के आहे. आता, नववी आणि दहावीचा निकाल एकत्रितपणे बघून त्यानुसार शाळांची गुणवत्ता ठरविली जाणार आहे. त्यानुसार, दोन्ही वर्गांच्या परीक्षा गंभीरपणे घेतल्या जाव्या, अशा सूचनाही जरग यांनी दिल्या.

यावेळी व्यासपीठावर नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, माध्यमिक शिक्षणाधिकारी सतीश मेंढे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजय वाघमारे तसेच इतर अधिकारी व मुख्याध्यापक संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रगत ‌शैक्षणिक कार्यक्रमासंदर्भात विविध सादरीकरणे यावेळी करण्यात आली.

नववीलाही पुनर्परीक्षा
दहावीप्रमाणेच आता नवव्या वर्गाचीही पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, अशी माहिती शिक्षण संचालकांनी दिली. मुलींचा निकाल शंभर टक्के लागावा आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी शाळांमधून घेतली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्यात आजघडीला शिक्षकांनी २३०६ मोबाइल अॅप्स आणि ३८ हजारपेक्षा जास्त अॅप्स तयार केले आहेत. राज्यातील शिक्षक टेक्नोसॅव्ही होत असून सर्वच शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जरग यांनी केले.


मुख्याध्यापकांसाठी दारे बंद
या कार्यशाळेला विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. जरग यांच्या भाषणानंतर मुख्याध्यापकांना मधली सुटीही देण्यात आली. मात्र, या सुटीदरम्यान मुख्याध्यापक निघून जाऊ नये म्हणून मुंडले शाळेचे प्रवेशद्वारच बंद करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे, कुणाही शिक्षकाला वाहन घेऊन बाहेर जाणे अशक्य झाले होते. सकाळची शाळा करून आलेल्या मुख्याध्यापकांचा मात्र या ‘शिस्तप्रियते’मुळे काही क्षण पारा चढला होता. एरवी विद्यार्थ्यांना शिस्त लावणाऱ्या मुख्याध्यापकांसाठी शिक्षण विभागाने असा प्रकार का करावा, याची चर्चा मात्र कार्यशाळेच्या ठिकाणी सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>