स्थळ : त्रिमूर्तीनगर, वेळ दुपारी १ वाजता त्रिमूर्तीनगरातील एका फुटपाथवर एक पंचर दुकानदार आहे. तो सकाळी एका ठिकाणी असतो. ऊन पडले की जवळील झाडाखाली जाऊन बसतो. पण आज त्या झाडाचादेखील उपयोग होत नव्हता. दुपारी या पंचरवाल्याने कसा बसा आडोसा घेतला होता. त्याचवेळी एक जण त्याच्याकडे दुचाकी घेऊन पंचर काढण्यासाठी आला. या पंचरवाल्याने पत्र्याच्या पेटीतील पाना घेऊन चाक काढायला घेतला. पण, पाना इतका तापला होता त्या पंचरवाल्याचा कदाचित हातच पोळला गेला. तो गरम पाना त्याने अक्षरश: फेकला. 'गाडी दुरुस्त होणार नाही. मी निघालो', असे सांगत ती तापलेली पत्र्याची पेटी कशीबशी सायकलवर ठेऊन तो निघून गेला. हातावर पोट असल्याने एक ग्राहक सोडणे न परवडणारे. पण, निसर्गासमोर कोणाचे चालणार? इकडे या गाडीवाल्याला बिचाऱ्याला भर उन्हात गाडी ओढत अन्यत्र जावे लागले.
स्थळ : उत्तर अंबाझरी मार्ग, वेळ दु. २ वा. अशा तापत्या उन्हात सेल्स बॉय अथवा डिलिव्हरी बॉयचे होणारे हाल भयानक. कुरियर, पिझ्झा पोहोचविणाऱ्यांना कशाचीही पर्वा न करता आपले काम करावेच लागते. त्यांचे पत्तेदेखील दूर-दूर असतात. असाच एक पिझ्झा पोहोचविणारा मुलगा भर उन्हात बाइकने जात होता. अचानक रस्त्यावरील झाडाचा लहानसा आडोसा पाहून त्याने गाडी थांबवली. हेल्मेट काढले आणि स्वत:चे घामाने भिजलेले केस मोकळे केले. पाच मिनिटे हा पिझ्झा बॉय झाडाखाली निवांत थांबून राहिला. भर उन्हात डोळ्यांना आराम दिला. पुढे त्याच थकव्याने पुढील 'डेस्टिनेशन'वर निघाला.
स्थळ : अंबाझरी, वेळ दु. ३.३० वा. अंबाझरीकडून समोर जाणाऱ्या रस्त्यावर एक आजोबा काठी टेकवत जात होते. अचानक ते थांबले आणि एका मोकळ्या मैदानाला लागून असलेल्या जेमतेम दोन फुटांच्या सावलीत जाऊन बसले. दाढी आणि केस वाढलेले हे आजोबा तिथेच डोळे मिटून बसले. जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली असता ते म्हणाले, 'वर्ध्याच्या आर्वी नाक्याला राहतो. इथे पांढराबोडीत मुलगा राहतो. मुलाची आठवण आली म्हणून आलो. शंकरनरला उतरलो आणि तिथून पायी आलो. आता या उन्हात चालवणं होत नाही. आत्ता कुठे सावली मिळाली, म्हणून बसलो. गरम झावांनी गरगरायला होतंय. थोडा वेळ थांबून मग जाईन पुढे. मुलगा जवळच राहतो.'
स्थळ : शिवाजीनगर, वेळ दु. ३ वा. या चौकात काही ऑटोवाले भर दुपारी ग्राहकांची वाट पाहत बसले होते. तसेही विविध कॅब्जमुळे ऑटोवाल्यांचा धंदा कमी झाला आहे. तरी दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षा करत बसण्याखेरीज त्यांच्याकडे अन्य पर्याय नाही. यापैकी एक ऑटोवाला तापत्या उन्हात ग्राहकांची प्रतीक्षा करून अक्षरश: वैतागून केला. ग्राहक काही येत नाही, हे पाहून त्याने डोक्याला गमचा बांधला. शर्ट काढला. पँट वर केली आणि बनियानवर मागील सीटवरच वैतागून डोळे मिटले. उन्हापासून हाल होताना दुसरे काय करणार?
झोपडपट्टीतील आयुष्य विदारक तापत्या उन्हात सुसंपन्न घरातील लोक एसीला जवळ करतात. सामान्य घरातही कूलर असतात. पण, हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे काय? भर उन्हात घमेले उचलत काम करणारे मजूर कामावर निघून जातात. इकडे त्यांच्या घरी मात्र पत्नी आणि कधी लहान मुले भरदुपारी एकटे असतात. वर टिनाचे शेड आणि बाहेर आग ओकणारा सूर्य. अशावेळी उन्हापासून तान्ह्या बाळाचे रक्षण करण्यासाठी कूलरची सोयदेखील अशक्यच. हे असे विदारक दृष्य झोपडपट्टीत दिसून येते. पण मग या झोपडीतले उन्हापासून स्वत:ला वाचवतात कसे? तर झोपडपट्टीत फिरले असता प्रत्येकाने आपल्या झोपडीत येणारा प्रकाश कुठल्या ना कुठल्या पद्धतीने झाकल्याचे दिसून आले. मिळेल त्या मार्गाने आत येणारा प्रकाश व त्याद्वारे येणाऱ्या झळा थांबवायच्या, असाच प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसला. आत किमान ऊन तरी येणार नाही, एवढाच काय तो दिलासा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट