शतकोटी, पाचशे कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणा हवेत विरल्यानंतर येत्या १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू होत आहे. त्यासाठी महापालिकांना प्रत्येक वॉर्डात किमान दोनशे व संपूर्ण शहरात २० हजार रोपटे लावण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
राज्यात सद्यस्थितीत २० टक्के वन असून भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनीकरण आवश्यक असल्याने युती सरकारने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम करण्याची तयारी केली आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विकास महामंडळ दीड कोटी रोपट्यांची लागवड करण्यात येणार असून अन्य विभागांमार्फत ५० लाख रोपे लावण्याचे टार्गेट आहे. सर्व महापालिका, नगरपालिका कार्यालये, मोकळी मैदाने, उद्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा रोपे लावण्यात येतील. प्रत्येक कार्यालय परिसरात किमान १५ रोपे लावावी लागणार आहे. क वर्ग नगर परिषदेला प्रत्येक वॉर्डात ५० आणि गावात एक हजार, ब वर्ग नगरपरिषदांना वॉर्डात ७५ व गावात दीड हजार रोपे, अ वर्ग नगर परिषदांना वॉर्डात शंभर आणि गावात दोन रोपे लावण्याचे टार्गेट सरकारने निश्चित केले आहे. या अभियानासाठी विभाग, जिल्हा व स्थानिक पातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीसाठी ३१ मे पूर्वी खड्डे तयार करावयाचे आहेत.
आंबा, चिंच, आवळा, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, पळस, क्यॅशिया, गुलमोहर व चाफासह शिसम, अगस्ती, बेल, सप्तपर्णी, काशीद, सोनमोहर, शिरीष बहावा, कैलासपती, अनंत, आकाशनिम, बकुळ, पारिजातक, अशोक, बांबू, गिरिपुष्प, बोर, डुरंगी, पिपळी, महुवा, कुसुम, जांभूळ, बेहडा, आवळा आदी फळ, फुलांच्या वृक्षांवर भर देण्यात आला आहे. ३० जून पर्यंत सर्व रोपे उपलब्ध करून देण्यात येतील. ५ जून ला पर्यावरण दिनापासून जनजागरण करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट