दिवाळीनिमित्त खरेदीकरिता काढलेले पैसे आणि बँकेच्या लॉकरमधून पूजेकरिता काढलेले दागिने चोरट्याने पळविल्याची घटना प्रतापनगर परिसरात घडली. या प्रकरणात परत एका ज्येष्ठ नागरिकाला टार्गेट करण्यात आले आहे.
रमेश सीताराम गिराडे (६६, रा. पांडे लेआउट) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १.४५ ते २ च्या सुमारास घडली. यावेळी गिराडे कामानिमित्त बाहेर गेले होते. दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करण्याकरिता त्यांनी एटीएममधून काही पैसे काढले. तसेच बँकेच्या लॉकरमधून दागिने काढले. पैसे आणि दागिने एका बॅगेत टाकून त्यांनी ती बॅग त्यांच्या गाडीच्या डिक्कीत टाकली. आपल्या दुचाकीने ते घरी पोहोचले आणि त्यांनी डिक्कीतील बॅग बाहेर काढली. घरात जात असताना त्यांच्या मागाहून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग हिसका देऊन पळविली. आरोपी काही क्षणातच तेथून पळून गेला.
याखेरीज प्रतापनगर पोलिस ठाण्याच्याच हद्दीत घडलेल्या एका अन्य घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोकसेवानगर परिसरात घडली. पुष्पा जयनारायण शर्मा (६२) आपल्या घरासमोर वॉक करीत असताना एक अनोळखी इसम तेथे आला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने त्यांचे लक्ष वळविले आणि गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील २४ हजार रुपयांचे मंगळसूत्र पळविले. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट