सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत एका व्यक्तीला अटक करून त्याला दिवसभर पोलिस कोठडीत ठेवणारे सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. एम. बंडीवार आणि पोलिस उपनिरीक्षक गवई यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हेल्मेटसक्तीच्या कारवाईवरून झालेल्या वादानंतर सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी एका व्यक्तीला अटक केली होती. परंतु या व्यक्तीला जामिनाशिवायच मुक्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. याप्रकरणी ‘मटा’ने शनिवारच्या अंकात पोलिसांच्या अरेरावीला वाचा फोडली होती, हे विशेष.
हरिश्चंद्र मेंधरे (३४, शिवनगर) असे या प्रकरणात पोलिसंनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. व्यवसायाने इंजिनीअर असलेले मेंधरे हे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झाशी राणी चौकातूनच दुचाकीने जात असताना चौकातील वाहतूक शिपाई प्रशांत ठावरे यांनी त्यांना अडविले व हेल्मेट घातले नसल्याने ई-चालानसाठी ते मेंधरे यांचा गाडीसह फोटो काढू लागले. त्याला मेंधरे यांनी विरोध केला. या झटापटीत त्यांचा शर्ट फाटला. त्यामुळे मेंधरे व चौकातील पोलिसांमध्ये वाद झाला. ‘माझा शर्ट का फाडला’, असा मेंधरे यांचा प्रश्न होता. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक खोळंबली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मेंधरे यांच्याविरोधात सीताबर्डी ठाण्यात सरकारी कामात व्यत्यय आणल्याच तक्रार दाखल केली. शिपाई ठावरे यांना शिवीगाळ करून छातीवर ठोसा मारल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी मेंधरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. शुक्रवारी दिवसभर व रात्री पोलिसांच्या कोठडीत राहिल्यानंतर मेंधरे यांना शनिवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जे. आर. घाडगे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मेंधरे यांची बाजू मांडताना अॅड. आकाश गुप्ता म्हणाले ‘मेंधरे यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्यात जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या आदेशांचे उल्लघंन करून सीताबर्डी पोलिसांनी मेंधरे यांना अटक केली आहे.’ यावर न्यायालयाने पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच उपरनिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच मेंधरे यांना जामीन आणि जातमुचलक्याशिवायच सोडण्याचे आदेश दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट