जिल्हा मुख्यालय आणि काही तालुका मुख्यालयांचा अपवाद वगळता दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये आर्थिक परिस्थितीअभावी ऐन दिवाळीतही अंधार दिसतो. फटाक्यांची आतषबाजी, चिवडा, चकली, लाडू हे तर दुर्मिळच! या साऱ्यांची दिवाळी आनंदात जावी, त्यांच्या आयुष्यातही प्रकाशपर्व पेरला जावा म्हणून गडचिरोलीत काम केलेल्या जुन्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या आयुष्यात दिवाळीच्या आनंदाची पेरणी केली. सुमारे ५० गावांत यानिमित्ताने प्रकाशोत्सव रंगला.
आदिवासींसाठी झटणारे हे अधिकारी पुणे, सातारा, नागपूरसह राज्याच्या सहा भागांतील. नोकरीच्या निमित्ताने त्यांचा गडचिरोलीशी संपर्क आला. आदिवासींच्या वेदना पाहताना त्यांचेही काळीज पाझरले. व्यवस्थेत असताना एका क्षमतेपलीकडे करणे शक्य नव्हते. पण, किमान दिवाळीत त्यांना आनंद मिळवून द्यावा म्हणून प्रयत्न सुरू झाले. त्याचे परिणाम दिसले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अतिदुर्गम भागात साहित्य पोहचले. कपडे, फटाके, सोबतच चिवडा, लाडू, चकली या फराळाच्या साहित्यासह शाळकरी मुलांसाठी शाळेच्या बॅगा आणि इतर साहित्याचाही यात समावेश होता. गडचिरोलीच्या जिल्हा पोलिस मुख्यालयात हे साहित्य पोहचल्यानंतर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अतिदुर्गम अशा ४० पोलिस ठाण्यांना हे साहित्य पाठविले. तिथे गेल्यानंतर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना बोलावून हे साहित्य वितरीत करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी दुर्गम भागातील पोलिस ठाण्यातही फराळाचे साहित्य बनवून गावात वितरीत करण्याच्या पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार अनेक ठिकाणी फराळाचे साहित्य वितरीत करण्यात आले होते. अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील दामरंचा येथे यासंदर्भातील कार्यक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी आयोजित केला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट