क्रीडा विकासाला सरकार वाद देत असतानाच गोंदियाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय महिनाभरापासून अंधारात आहे. वीज नसल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामे बाहेरून करावी लागत असल्याने संताप आहे.
गोंदिया जिल्हा मुख्यालयावर १४ कोटी रुपयांचा जिल्हा क्रीडा संकुल, तर तालुकास्थळांवर तालुका क्रीडा संकुल बांधकामाकरिता तत्कालीन सरकारने निधी मंजूर केला. गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल निधी आणि इतर कारणांमुळे वारंवार प्रकाशझोतात राहिले. अद्याप कामे अपूर्ण आहेत. फक्त इमारत बांधून तयार झाली होती. त्यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात होते. मात्र, भूमिअभिलेख कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत हलवायचे असल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अपूर्ण आणि हस्तांतरित न झालेल्या इमारतीत हलविण्याचे आदेश काढले. त्यामुळे क्रीडा अधिकारी कार्यालय नोव्हेंबर २०१५मध्ये नवीन इमारतीत स्थानांतर झाले. परंतु, ही इमारत हस्तांतरित झाली नसल्याने कार्यालयाकडे विजेची सोय नव्हती. कंत्राटदारानेदेखील काम बंद असल्यामुळे वीज बिलाचा भरणा केला नाही. महावितरणने वारंवार नोटीस बजावल्या. परंतु, बिलाचा भरणा केला नसल्याने ५ सप्टेंबर २०१६ रोजी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. आता कार्यालय अंधारात असून कार्यालयीन कामे खिशातून पैसे खर्च करून बाहेरून करावी लागत आहेत.
रिक्तपदांचीही अडचण
गोंदिया जिल्ह्याची स्थापना १९९९मध्ये झाली. त्यामुळे गोंदिया येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. परंतु, अद्याप या विभागाचा गाडा भंडारा येथून हाकण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते सर्व कामे भंडारा येथून होतात. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय असतानाही प्रत्यक्षात येथे रिक्त पदांचा भरणा आहे. पूर्णकाळ जिल्हा क्रीडा अधिकारी नाहीत. क्रीडा अधिकारी, परिचर, लिपिक, क्रीडा मार्गदर्शक यांचीही पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामे करण्यास विभागाला कमालीची कसरत करावी लागत आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी याकडे लक्ष देत विभागाच्या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट