महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध वसुलीची मोहीम तीव्र केली असून दिवाळीच्या चार दिवसांमध्ये नागपूर परिमंडळात सुमारे ११ कोटी ८८ लाख २९ हजार रुपयांची वसुली केली आहे. कंपनीने नागपूर व वर्धा जिल्ह्यात ही कारवाई केली आहे.
मागील काही महिन्यांत नागपूर आणि वर्धा जिल्हातील थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले होते. रेशमे यांनी मागील काही दिवसांत त्यांच्या अखत्यारीतील प्रत्येक विभागाचा प्रत्यक्ष आढावा घेत कार्यकारी अभियंत्यांपर्यंत थकबाकी वसुलीच्या सूचना दिल्या आहेत. यात एक लाखावरील थकबाकी असणारे, २५ हजार ते १ लाखापर्यंतचे ग्राहक, दहा हजार ते २५ हजार, तीन हजार ते दहा हजार आणि शंभर ते तीन हजारांची थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील वसुलीचे उद्दिष्ट थकबाकी रकमेच्या अनुषंगाने मुख्य अभियंता ते लाइनमनपर्यंत दिले आहे.
त्यानुसार, लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील चारच दिवसांत ५२ हजार ३६८ थकबाकीदारांनी ११ कोटी ८८ लाख २९ हजार रुपयांचा भरणा केला आहे. २१ ऑक्टोबरला नागपूर परिमंडलातील २० हजार ८८५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी ८ लाख ६७ हजारांची थकबाकी होती, ४२३० औद्योगिक ग्राहकांकडे ४ कोटी १० लाख ५४ हजाराची थकबाकी होती तर २ लाख ३० हजार ८१२ घरगुती ग्राहकांकडे ३३ कोटी ७४ हजार आणि परिमंडलात एकूण २ लाख ५५ हजार ९०७ ग्राहकांकडे ४५ कोटी १९ लाख ६५ हजाराची चालू वीजबिलापोटी थकबाकी होती. त्यापैकी २४ ऑक्टोबरपर्यंत ६४२० वाणिज्यिक ग्राहकांनी ३ कोटी १४ लाख १४ हजारांचा भरणा केला तर १२६१ औद्योगिक ग्राहकांनी १ कोटी १३ लाख ७२ हजारांचा याशिवाय ४४६८७ घरगूती ग्राहकांनी ७ कोटी ६० लाख ४४ हजारांचा भरणा केला आहे.
महावितरणने थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेली मोहीम यापुढेही निरंतर राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट