Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

​ पंजाब नॅशनलच्या विम्यापासून सावधान

$
0
0

कंपनीला ग्राहक मंचाने खडसावले
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
विमा कंपन्यांनी परतफेड करताना फसवणूक केली अथवा ग्राहकाची पिळवणूक केल्याची अनेक प्रकरण आजवर घडली आहेत. पण, चक्क सरकारी अर्थात सार्वजनिक बँकेशी संबंधित विमा कंपनीकडूनदेखील फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे. पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित अशाच एका विमा कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक झाली. त्यांना ग्राहक मंचने फटकार लगावली.

धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण स्वत:चे भविष्य सुरक्षित करू इच्छितो. यासाठीच नानाविध कंपन्या विमा घेऊन बाजारात आल्या आहेत. त्यामध्ये आता तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकादेखील मागे नाहीत. अशा काही कंपन्या विम्यासोबतच गुंतवणुकीचा पर्यायदेखील देतात. पण, त्यातून ग्राहकाची पिळवणूक आणि फसवणूक झाल्याची घटना नागपुरात घडली.

सदर येथे राहणारे नलीन मजिठिया यांनी पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मेटा लाइफ इंडिया इन्शूरन्स कंपनीकडून विमा पॉलिसी काढली होती. ही युनिट लिंक विमा पॉलिसी असल्याने गुंतवणूक होती. पण त्यात मृत्यू विमा समाविष्ट होता. कंपनीच्या एजंटने नलीन यांच्याकडून पहिला हफ्ता घेतला व कोऱ्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. नलीन यांचे उत्पन्न जास्त नसल्याने ही पॉलिसी तीन वर्षांची असल्याचे एजंटकडून सांगण्यात आले. त्यानुसार तीन वर्षानंतर त्यांनी रक्कम व अन्य लाभ मिळण्यासाठी अर्ज केला असता त्यांना ही पॉलिसी पाच वर्षांची असल्याचे सांगण्यात आले. पण तरीहीदेखील त्यानुसार मुदतपूर्वीची किमान १ लाख ०९ हजार ०८६ रुपयांची रक्कम परत मिळावी, अशी मागणी नलीन यांनी कंपनीकडे केली. पण, वारंवार अर्ज केल्यानंतरही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर कंपनीने वरील रकमेपैकी तब्बल ४२ हजार ८९९ रुपये कापून घेतले व फक्त ६६ हजार १८७ रुपयांचा धनादेश परत केला. पण याहून धक्कादायक बाब म्हणजे, हा धनादेश तारीख उलटून गेलेला होता. यामुळे नलीन यांना आणखीनच धक्का बसला. त्यांनी या धनादेशावरील तारीख वाढवून देण्याची मागणी पीएनबी मेटा लाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे केली. पण, कंपनीने त्यांना कुठलेही सहकार्य केले नाही. कापलेली रक्कम परत केली नाही व धनादेशावरील तारीखदेखील वाढवली नाही. यामुळे नलीन मजीठिया यांना अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घ्यावी लागली.

नलीन यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केल्यानंतर मंचने विरुद्ध पक्ष असलेल्या पीएनबी मेटा लाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनीला नोटीस बजावली. पण नोटिशीला उत्तर देताना कंपनीने उलट नलीन यांनीच खोटे आरोप केल्याचा दावा केला. तक्रार मुदतीच्या बाहेरील असल्याने ती ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही, असा दावा त्यांनी मंचासमोर केला. पण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रार आणि विरुद्ध पक्षाचा दावा यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांनी केलेल्या सुक्ष्म परीक्षणात कंपनीने ४२ हजार ८९९ रुपये कापून घेण्यामागील कारणाचे विवरण सादर केले नाही तसेच पॉलिसी खंडीत केली असल्याचे विवरणदेखील त्यांनी तक्रारकर्ते नलीन यांना वेळोवेळी दिले नाहीच. यासोबतच धनादेशाची तारीखदेखील वाढून दिली नाही. यावरुन विरुद्ध पक्ष असलेल्या पीएनबी मेटा लाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनीने न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे, असा निष्कर्ष काढत त्यांनी नलीन मजिठीया यांना ६६ हजार १८६ रुपये २०१२ पासून आठ टक्के व्याजदराने परत करावे तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी यांच्यासह सदस्य प्रदीप पाटील आणि मंजूश्री खनके यांनी दिला. तक्रारकर्ते नलीन मजीठिया यांच्याकडून अॅड. जयश्री जुनघरे यांनी बाजू मांडली.

ग्राहकांच्या हक्कांसाठी संकेतस्थळ

नागपूर : ग्राहक या नात्याने आपण जागरूक असतोच. पण अनेकदा आपल्या नकळत फसवणूक होते. फसवणूक झाली की न्याय कसा मागावा, हे माहीत नसते. यासाठीच विविध संघटना कार्यरत असून काही संकेतस्थळेदेखील आहेत. www.caiindia.in हे त्यापैकीच एक संकेतस्थळ.

कन्झुमर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या या वेबसाइटवर आपल्या ग्राहकांचे हक्क, अधिकार याविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते. ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक न्यायालयाकडून देण्यात आलेले निकाल, ग्राहकांच्या तक्रारी आदी माहिती याठिकाणी उपलब्ध होऊ शकते. असोसिएशनतर्फे ग्राहक विषयक विविध विषयांवर करण्यात आलेल्या पाहणीसंदर्भातील माहिती आपल्याला पाहायला मिळू शकते. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि सुविधांमध्ये असलेल्या त्रुटी, ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी या असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना उपयुक्त ठरणारी माहिती असोसिएशनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्काची माहिती व्हावी, ग्राहक चळवळीतील त्यांचा सहभाग वाढावा हा या असोसिएशनचा उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>