नागपूर स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी अजनी स्थानकाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी दिली. अग्रवाल एका दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
नागपूर रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम, होम प्लॅटफॉर्म तसेच अजनी विद्युत लोकोशेडची त्यांनी पाहणी केली. लोकोशेडमधील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीमचे उदघाटन या प्रसंगी त्यांच्या हस्ते झाले. रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवाशी संघटनांच्या प्रतिनिधींशीही त्यांची चर्चा रून प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बहुतांश सर्वच महत्त्वाच्या गाड्या नागपूर स्थानकावरून सुटतात. त्यामुळे शहराच्या सर्व भागातील प्रवाशांना याच स्थानकावर यावे लागते. काही गाड्या अजनीवरून सोडल्यास मुख्य स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होऊ शकतो. त्यामुळे अजनी स्थानकाचा विकास करून भविष्यात काही गाड्या अजनीवरून सुरू करण्यात येतील व त्या तेथेच समाप्त करण्यात येतील, असे ते म्हणाले. लाखो रुपये खर्च करून नागपूर स्थानकावर होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात अली. मात्र आजघडीस केवळ दुरंतो ही एकमेव गाडी या प्लॅटफॉर्मवरून सुटते. नागपूर- कळमना रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर होमप्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नागपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. १, २ व ३ वरील रेल्वे मार्ग वळणाचे आहेत. उड्डाण पुलाच्या पिलर्समुळे ते आजवर सरळ करता येत नव्हते मात्र आता जुना उड्डाण पूल पाडण्यात आला आहे. त्यामुळे पुढील २-३ वर्षात हे रेल्वेमार्ग सरळ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्र. ५ व ६ यांची लांबी वाढविणार असल्याची माहितीह अग्रवाल यांनी यावेळी दिली. रेल्वेच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक वाटा असतो तो कोळसा वाहतुकीचा मात्र कोळसा वाहतुकीचे प्रमाण सध्या कमी झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही झाला असल्याचे त्यांनी मान्य केले. पुढील सहा महिन्यात हे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डीआरएम बृजेश गुप्ता, एडीआरएम त्रिलोक कोठारी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक के. के. मिश्रा, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट