कौटुंबिक हिंसाचाराचे कायदे महिलांच्या बाजूने असले तरी पुरुषांवरही मानसिक अत्याचार होत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाने केलेले निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले. तसेच नागपुरातील प्रतिथयश कॉलेजमधील प्राध्यापकावर त्याच्या पत्नीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.
शहरातील नामवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या राजेश (नाव बदलले) यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी राजश्री (नाव बदलले) यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा, हुंड्यासाठी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच पतीने कॉलेजमधील विद्यार्थिनीवर अत्याचार केला असून, त्यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचेही आरोप केले होते.
दरम्यान, पत्नीकडून होत असलेल्या मानसिक अत्याचारामुळे व्यथित झालेल्या राजेश यांनी कौटुंबिक न्यायालयातील न्या. मकरंद अधवंत यांच्या न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळीदेखील राजश्री यांनी पतीवर गंभीर आरोप केलेत. त्याच कालावधीत भंडारा न्यायालयात खावटीसाठी अर्ज केला होता. तेथील न्यायालयाने पाच हजार रुपये दरमहा खावटी मंजूर केली होती.
कौटुंबिक न्यायालयात राजेश यांच्यावतीने बाजू मांडताना अॅड. श्याम अंभोरे यांनी राजश्रीने केलेले आरोप फेटाळून लावले होते. राजश्रीने माहितीच्या अधिकाराखाली पतीविरुद्ध अत्याचाराची माहिती कॉलेजला मागितली होती. परंतु, कॉलेजमध्ये असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे व्यवस्थापनाने कळविले होते. तर अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे कोणतेही पुरावे सादर करण्यात राजश्रीला अपयश आले होते. त्यामुळे पतीची नाहक बदनामी आणि त्याला मानसिक छळ करण्याच्या उद्देशानेच आरोप करण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. अंभोरे यांनी केला. हा युक्तिवाद कौटुंबिक न्यायालयाने ग्राह्य मानून राजेशच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मान्य केला. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका राजश्रीने हायकोर्टात दाखल केली. परंतु, तिथेही हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल योग्य ठरवीत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे राजश्रीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे कौटुंबिक न्यायालयाने राजेशच्या बाजूने दिलेल्या निरीक्षणाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली. पत्नीकडून पतीला मानसिक छळ होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी हस्तक्षेप करता येत नाही, असे नमूद करीत याचिका फेटाळून लावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट