मे महिना पुढे जात आहे तसतसा उन्हाचा कहर सुरू झाला आहे. शनिवारी नागपुरात पाऱ्याने तब्बल ४६.६ अंशांचा टप्पा गाठला. हे या मोसमातील सर्वोच्च तापमान होते.
मागील आठवड्यात विदर्भ सूर्यजाळ अनुभवत होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरातील वादळामुळे बुधवार-गुरुवारी ढगाळ वातावरणासह पाऱ्यात घसरण झाली. पण, तापमान पुन्हा वाढणार, असे संकेत होतेच. तरीही ते टप्प्याटप्प्याने वाढत जाण्याची शक्यता असताना शनिवारी अचानक मोठी वाढ झाली.
नागपुरात शनिवारी सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत होत्या. दुपारी १२ नंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात शुष्कता निर्माण झाली. त्यामुळे गरम वारे वाहू लागले. या गरम वाऱ्यांसोबतच सूर्यदेखील तीव्र झाल्याने तापमानात वाढ होत गेली. पाहता-पाहता पारा ४६.६ अंश सेल्सिअस या मोसमातील उच्चांकावर पोहोचला. पाऱ्यात मोठी वाढ झाल्याने सायंकाळदेखील उष्ण होती. गरम वारे रात्रीपर्यंत सुरू होते. रात्रीदेखील घराच्या भिंती गरम वाटत होत्या. प्रत्येक जण उन्हाच्या झळा व परिणामी उष्म्यापासून वाचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होता.
विदर्भात वर्धा वगळता अन्य ठिकाणी पारा सामान्य होता. वर्धेत ४६.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर दोन दिवस ४७ अंशांचा टप्पा अनुभवलेल्या अकोलेकरांना शनिवारी दिलासा मिळाला. तेथील तापमान ४२.५ अंशांपर्यंत घसरले. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूरचा पारा ४५ अंशांदरम्यान होता. चंद्रपुरात तर रात्रीचे किमान तापमानदेखील ३२ अंशांवर गेल्याने हाल होताहेत. येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, नागपूर आणि वर्ध्यात पारा सरासरीपेक्षा तब्बल चार अंशांनी अधिक आहे. उष्णतेची ही लाट येत्या दोन दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यादरम्यान पाऱ्यात आणखी वाढ होऊन तो ४७ अंशांपर्यंत जाऊ शकतो. संपूर्ण विदर्भात गुरूवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पारा हळहळू कमी होऊन सामान्य होईल. पण तरिही महिनाअखेरपर्यंत पारा ४२ ते ४४ अंशांपर्यंत असेलच, असा अंदाज आहे.
४७.९ : आतापर्यंतचा उच्चांक नागपूरचे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान ४७.९ अंश सेल्सिअस राहिले आहे. २३ मे २०१३ रोजी ते नोंदविण्यात आले. तर मागील ११ वर्षांत सर्वोच्च तापमान हे सहसा ४७ अंशांच्या वर असल्याचेच दिसून आले आहे. यामुळेच पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंतचा काळ नागपूर आणि विदर्भासाठी महत्त्वाचा असेल. यादरम्यान पारा विक्रम मोडतो का, हे पाहणे आवश्यक असेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट