केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेने यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांवर मात केली आहे. दरवर्षी साधारणतः विज्ञान शाखेतून टॉपर देण्याची परंपरा मोडीत काढीत हा सन्मान वाणिज्य शाखेने खेचून आणला आहे. वाणिज्य शाखेचा सुसरला अरविंद जयराम नागपुरातील सर्व शाखांमधून संभाव्य टॉपर ठरला आहे. माँटफोर्ट शाळेच्या मनोज्ञा रंजन हिने विज्ञान शाखेत तर अनुश्री औरंगाबादकर हिने कला शाखेत यश मिळवले आहे.
दरम्यान, नागपूर आणि विदर्भाचा समावेश असलेल्या सीबीएसईच्या चेन्नई विभागातून मुलींनी आघाडी घेतली आहे. या विभागातून ५४,७५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५०,७२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलींची टक्केवारी ९३.९२ टक्के तर मुलांची टक्केवारी ९१.६३ टक्के इतकी आहे.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता सीबीएसईच्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आधी जाहीर केल्यानुसार निकालाची वेळ दुपारी १२ ची होती. मात्र, ठरलेल्या वेळेच्या आधी सीबीएसईच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निकालासाठी लगबग सुरू झाली. शाळांमध्येही आपल्या विद्यार्थ्यांचे निकाल संकेतस्थळावर बघण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने यंदा डिजिटल गुणपत्रिकादेखील पुरविण्यात आल्या आहेत. www.digilocker.in या संकेतस्थळावर या डिजिटल गुणपत्रिका यंदा पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माँटफोर्ट शाळेच्या मनोज्ञा रंजन हिने ९५.८ टक्के गुण मिळवीत विज्ञान शाखेतून सर्वोच्च स्थान मिळवले आहे. वाणिज्य विभागात टॉपर ठरलेला सुसरला अरविंद जयराम हा सिव्हिल लाइन्स भवन्स शाळेचा विद्यार्थी आहे. त्याला ९६.८ टक्के गुण मिळाले आहे. मानव्यशास्त्र शाखेतून अनुश्री औरंगाबादकर हिने नागपुरात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. भवन्सच्या अनुश्रीला ९५.४ टक्के गुण मिळाले आहेत. १ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. निकाल लागल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ४ जूनपर्यंत ती चालणार आहे.
गणित, इंग्रजीने घसरली टक्केवारी सीबीएसई बारावी परीक्षेतील गणिताचा पेपर कठीण आणि मोठा आल्याने देशभर गहजब झाला होता. अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण पेपर न सोडविता आल्याने मानसिक तणावही आला होता. दरम्यान, या मुद्द्यावरुन देशभरातील पालकांच्या रोषाचा सामना सीबीएसईला करावा लागला होता. पालक आणि विद्यार्थ्यांसह देशातील अनेक शाळांनी त्याबाबत मंडळाकडे तक्रारही केली होती. गणिताचा हा पेपर विद्यार्थ्यांना कठीण गेल्याचे निकालावरुनही स्पष्ट झाले आहे. विविध शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपरमध्ये कमी गुण प्राप्त झाले आहेत. हुशार मुलांना शंभरपैकी ९५ पर्यंत गुण मिळाले असेल तरी सामान्यतः इतर विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये घट झाली आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी १५ ते २० गुण कमी मिळाले असल्याची माहिती आहे. त्याचा परिणाम एकंदर टक्केवारी कमी होण्यात झाला आहे. गणिताप्रमाणेच इंग्रजी विषयाच्या पेपरने विद्यार्थ्यांना काळजीत टाकले होते. इंग्रजीचा पेपर अत्यंत मोठा आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्या पेपरमध्येही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले आहेत. गणित आणि इंग्रजी या दोन विषयांचे पेपर कठीण आल्याने त्याचा परिणाम एकूण गुणांवर पडला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट