जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी (नॅशनल इन्फॉरमेशन सेंटल)च्या कार्यालयात सलग तीन महिने आमच्याकडून काम करवून घेण्यात आले. मात्र, या कामाचे मानधन तर दिलेच नाही. उलट आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले, अशी तक्रार डाटा एन्ट्रीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे केली आहे.
एनआयसीच्या कार्यालयात ४ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान काम केलेल्या कामगारांना कंत्राटदाराने तडकाफडकी काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वैभव तान्हे, प्रियंका ढोके, रुचिका ढोके, तुषार दास, अंकित डोबले, अंकित शेंडे, संदीप वानखेडे, सूरज चबरे, प्रियंका पराते, स्मिता बाबरे, मंगेश कोटागळे, सुजाता काळबांडे, दिनेश दाणी, मंगेश दाणी, आशा शेंडे यांनी प्रशासनाच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवरही या कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. काम करूनही वेतन न मिळणे, पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्यामुळे कर्मचाऱ्यांवर बेकारी ओढवली आहे. या प्रकरणाची चौकशी करून या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाने केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट