देवरी-चिचगड मार्गावर वाघाच्या कातडीची अवैध तस्करी केल्याप्रकरणी मुख्य आरोपी सुजान संतू कोरच्या (४०) रा. कुकडेल (जि.गडचिरोली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुजानच्या अटकेने वाघाची अवैध शिकार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सुजान कोरच्या याने जानेवारी २०१५मध्ये कातडी जप्त केलेल्या वाघाची शिकार केल्याचे कबूल केले. सुजान आपल्या गाई-बैलांना जंगलात चारायला घेऊन गेला असता त्याची गाय वाघाने मारली. ही घटना त्याच्या समक्ष घडल्याचे त्याने पुढील कट आखून वाघाने मारलेल्या गायीवर विष टाकले. मेलेल्या गाईचे मांस खाण्यास वाघ येईल आणि त्याचा मृत्यू होईल. अपेक्षेनुसार दुसऱ्या दिवशी त्याला वाघ मृतावस्थेत आढळला. सुजानने त्याचा मामेभाऊ माणिक पुडो रा. बदबदा याला फोनवरून घटनेची माहिती दिली. मृत वाघाचे कातडे काढण्यासाठी बोलाविले. माणिक पुडो हा रामजी दुर्रा, महादेव कल्लो, साईनाथ कल्लो यांना सोबत घेवून रात्री साडेनऊ वाजता सुजान कोरच्याच्या घरी आले. सुजानचा गावातील मित्र सावळराम नुरुटी या सर्वांना घेवून सुजान जंगलात पोहोचला. वाघाचे कातडे त्यांनी काढले. बाकीचे अवशेष जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघाची कातडी घेवून माणिक पुडो हा बदबदा या गावी निघून गेला. या वाघाच्या कातडीच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवराम तुलावी व रामसाय मडावी यांच्याकडून माणिक पुडो हा सुद्धा या तस्करी प्रकरणातील आरोपी असल्याचे समजले होते.
कातडी परीक्षणासाठी पाठविली
आरोपींकडून जप्त केलेली वाघाची कातडी विश्लेषणासाठी डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टीट्यूशन ऑफ इंडिया यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. तर हाडे परीक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत. वाघाची शिकार केल्यानंतर वाघाची कातडी जवळपास दीड वर्ष मोठा ग्राहक मिळेल यासाठी फिरत होती. यामध्ये गडचिरोली येथील डॉ.यादव व डॉ.कोरेटी (चिचगड) यांनाही अटक केली असून २२ आरोपींमध्ये यांचाही समावेश आहे.
मृत वाघाचे अवशेष जप्त
माणिक पुडो, साईनाथ कल्लो, महादेव कल्लो यांना पकडण्यासाठी वन विभाग गोंदियाच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया व गडचिरोली पोलिसांना सोबत घेवून १२ नोव्हेंबरला पहाटे सापळा रचला. यात माणिक पुडो सापडला तर उर्वरित दोघ फरार होण्यात यशस्वी ठरले. माणिक पुडोकडून मिळालेल्या माहितीनुसार वाघाची शिकार सुजान कोरच्या याने केल्याचे सांगितले. त्या आधारावर १४ नोव्हेंबरच्या पहाटे कोरची तालुक्यातील कुकडेल येथून मुख्य शिकारी सुजान कोरच्या याला पकडण्यात पथकाला यश आले. १९ नोव्हेंबरला सुजान कोरच्याला पथकाने सोबत घेवून गडचिरोली जिल्ह्यातील सहवनक्षेत्र कोरची बीट दवडी समशेर पहाडीजवळ कंपार्टमेंट नंबर ४९१ राखीव वनाजवळचा परिसर गाठला. तेथे जळलेल्या अवस्थेत काही भागाचे अवशेष (हाडे) मिळाले. हे मिळालेले अवशेष पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट