भारतीय संविधानाच्या ३४० कलमानुसार ओबीसींना हक्क, अधिकार व आरक्षण आहे. मात्र आजपर्यंतच्या सर्वच सरकारने या ३४० कलमाची अंमलबजावणी केली नाही. मात्र आता काही वर्षांपासून विविध ओबीसी संघटनांसह राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाने ओबीसी समाज जागृत होत आहे. याची नोंदही शासनस्तरावर होत असून सत्ताधारी व लोकप्रतिनिधी विचार करीत आहेत. ८ डिसेंबरचा महामोर्चा हा सरकारच्याविरोधातील नसून ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, राजकीय पक्ष समन्वयक तथा माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ९० टक्के ओबीसी हा शेतकरी असून राष्ट्रउभारणीत यांचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६०व्या वर्षापासून सरकारने पेंशन लागू करावी तसेच त्यांच्या शेतमालाला उत्पादनानुसार भाव देण्यात यावा यासाठी आमचा मुख्य लढा असल्याची माहिती डॉ. बोपचे यांनी दिली. ओबीसी समाजाची जनगणना जाहीर करण्यात यावी, केंद्र व राज्यात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नसून ओबीसी संवर्गाला अॅट्रासिटी कायदा लागू करण्यात यावा, संविधानातील कलमानुसार आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सातत्याने मेळावे व बैठका घेऊन ओबीसींची जनजागृती सुरू आहे. याशिवाय ओबीसींना संघटित करण्याचे कामही ओबीसी महासंघातर्फे होत आहे. शासनाने ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, असे प्राचार्य डॉ. तायवाडे म्हणाले. घटनेत कुठेच उल्लेख नसलेली नॉन क्रिमिलेअरची न्यायालयाने लावलेली अट ही समूळ रद्द करण्यात यावी तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण देऊन सरकारी यंत्रणाचे होणारे खासगीकरण थांबविण्यात यावे, त्यातही आरक्षण लागू करण्यात यावे, आमच्या हक्काची शंभर टक्के शिष्यवृत्ती ५० टक्के करणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आदी माहिती पत्रपरिषदेत दिली.
ओबीसी प्रवर्गातून महिलांना जागृत व संघटित करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे महिला अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यापुढेही ओबीसी प्रवर्गातील वकील, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे मेळावे घेण्यात येतील, असे डॉ. बोपचे म्हणाले. याप्रसंगी अनिल पाटील म्हशाखेत्री, बबनराव फंड, सचिन राजूरकर, दादाजी चापले, अरूण मुनघाटे, जीवन लंजे, प्रा. शेषराव येलेकर, संजय पन्नासे, डॉ. भुपेश चिकटे हजर होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट