नवे पोलिस आयुक्तालय तयार होत आहे. येथील काही कार्यालयांना अन्य ठिकाणी ‘शिफ्ट’ करावे लागेल. यासाठी गृह खात्याने धावपळ सुरू केली असून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची मंगळवारी तपासणी केली.
मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील कार्यालयांची तपासणी केली. जवळपास अर्धा तास त्यांनी झेडपीच्या काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे कळते. विभागीय आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी आज पाहणी केली. सध्या असलेल्या सिव्हिल लाइन्स येथील पोलिस आयुक्त कार्यालयामागील भागात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नव्या इमारतीत गुन्हे, विशेष शाखा, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय येथे हलविण्यात येणार आहे. तर, सध्या काम सुरू असल्याने पोलिस आयुक्त कार्यालयातील काही कक्ष अन्य ठिकाणी ‘शिफ्ट’ करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेची नवी इमारत तयार झाल्याने बरेचशे कार्यालय येथे स्थालांतरित करण्यात आले आहेत. पण, जुन्या इमारतीत आरोग्य, शिक्षण, कृषी, स्वच्छता विभाग अजूनही आहेत. त्यामुळे सर्वच कार्यालये नव्या इमारतीत नाही. जाग अपूरी अन् कामे जास्त, असल्याने कर्मचाऱ्यांवरही तणाव आहे. येथे जागाच नसल्याने पोलिसांना कुठून नवे कार्यालय द्यायचे, असा सवाल झेडपी अधिकाऱ्यांनी केल्याचे कळते. सीपी अॅण्ड बेरारच्या काळात जून्या झेडपीच्या इमारतीतून विभागीय आयुक्तालयातील काही कार्यालयांचे कामकाज झाल्याची माहिती आहे. त्याच धर्तीवर पोलिस आयुक्तालयातील काही कार्यालये स्थालांतरित करण्याचा आराखडा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट