जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम वर्ष २०१६-१७करिता धानाची खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून तलाठ्यांचा संप सुरू असल्याने शेतकरी गेल्यावर्षीचा सात-बारा घेवून केंद्रावर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन सात-बारा स्वीकारण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी ए. के. सवाई, जिल्हा मार्केटिंग अधिकारी खर्चे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ८७ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात येते. यावर्षी धानाचे पीक उत्तम असून गैर आदिवासी क्षेत्रात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ५७ धान खरेदी केंद्रावर १ लाख ७० हजार ६०० क्विंटल व आदिवासी क्षेत्रात ३८ धान खरेदी केंद्रावर ४७ हजार ९३९ क्लिंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीकरिता सात-बारा व त्यावरील धानपिकाखालील क्षेत्र यासाठी शेतकऱ्यांना तलाठी सात-बारा देत असतो. त्यानुसार धान खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. सद्यस्थितीत सात-बाराचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी व आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांच्या समस्या ऐकून घेतल्या व जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाइन सात-बारा स्वीकृती प्रदान केल्याचे त्यांनी सांगितले. तलाठ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये व हमी दरापेक्षा कमी दराने धान विक्री करावी लागू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय तलाठ्यांचा संप संपेपर्यंत घेण्यात आला आहे. तलाठ्यांचा संप संपल्यानंतर १५ दिवसांत मूळ सात-बारा संबंधित केंद्रावर जमा करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट